कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन रविवारी. २ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापुरात होणार आहे. महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी ९.०० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर हे अधिवेशन कोल्हापूरमध्ये होत असल्याचे सभेचे विश्वस्त व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
१८९९ मध्ये स्थापन झालेली दक्षिण भारत जैन सभा ही महाराष्ट्र व कर्नाटकातील जैन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्यासाठी कार्यरत असलेली अग्रगण्य प्रातिनिधीक संस्था आहे. सभेचे अध्वर्यू, शाहू संस्थानचे दिवाण, छत्रपती शाहू महाराजांचे निकटवर्तीय तसेच मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्री दि.ब. आण्णासाहेब लठ्ठे यांच्या दूरदृष्टीतून सभेच्या कार्याला भक्कम दिशा मिळाली. छत्रपती शाहू महाराजांनी दसरा चौक कोल्हापूर येथील जागा दिगंबर जैन बोर्डींग कोल्हापूर साठी 1901 साली बहाल केली. म्हणून सभेची पहिली शाखा कोल्हापूर येथे सुरुवात झाली.
दरम्यान यंदा कोल्हापुरात होत असलेल्या या अधिवेशनामध्ये गेल्या वर्षभरातील सभेच्या विविध उपक्रमांचा आढावा, आगामी वर्षासाठीचे संकल्प, समाजहिताच्या योजना आणि भावी कार्याची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. अधिवेशनास कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज , पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच आजी-माजी खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाची तयारी जोमात सुरू असून दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर व जैन श्राविकाश्रम पदाधिकारीसह सभेच्या सर्व शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
महाराष्ट्र व कर्नाटकातील जैन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पत्रकार परिषदवेळी उपस्थिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र विरेंद्र पाटील , केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब जिना पाटील चेअरमन संजय धनपाल शेटे, व्हाईस चेअरमन अभिनंदन रावसाहेब पाटील, मुख्य महामंत्री अनिल आप्पासाहेब बागणे, खजिनदार बाळासाहेब पाटील, संघटनमंत्री शशिकांत राजोबा , ट्रस्टी सुरेश जयकुमार रोटे, उपाध्यक्ष रवींद्र पाटील , महामंत्री श्रेणिक पाटील उपस्थित होते




