ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या जयंतीनिमित्त सोळांकूर येथे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सस्थेच्या ‘न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल’ शाखेचे उत्साहात उदघाटन
ज्ञानज्योती प्राचार्या सौ.शुभांगी गावडे यांच्या जयंती दिनी पाचवी नवी शाखा स्थापना करुन संस्थेने केली संकल्पपूर्ती
कोल्हापूर दि.30 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात, संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या कन्या आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांच्या मातोश्री, संस्थेच्या दिवंगत सचिवा, स्वर्गीय ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या ५४ व्या जयंतीचे औचित्य्ा साधून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने सोळांकूर, ता. राधानगरी येथे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल या नव्या शाखेचे उद्घाटन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री एम.डी.तोरस्कर, श्री निवास दादा पाटील, श्री ए बी पाटील, श्री. एस.टी. पानारी, श्री नंदकिशोर सुर्यवंशी संरकार, श्री के जी पाटील, श्री केरबा पाटील, श्री कमलाकर पाटील, श्री विलास आण्णा पाटील, श्री दयानंद लोहार, श्री मधुकर पाटील, श्री धनाजी चौगुले, डॉ.युवराज तोरस्कर हे उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.कौस्तुभ गावडे यांनी, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वसा व वारसा सांभाळून प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्वसुध्दा
आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. शिक्षणक्षेत्रात विविध पदांवर काम केल्यामुळे त्यांना शिक्षक व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची चांगली जाणीव होती. सर्वांशी चर्चा करुन समस्यांचे निराकरण करण्याचे कसब त्यांच्यामध्ये पहायला मिळते. ज्ञानाबरोबरच उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असे याचे द्योतक प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या कार्यामधून आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामधून दिसून येते. संपर्कात आलेल्या प्रत्येकी व्यकतीची आपुलकीने चौकशी करणाऱ्या आणि प्रत्येकांमधील ज्ञानज्योत फुलविणाऱ्या त्या ज्ञानज्योती होत्या. बदलत्या शिक्षणप्रवाहात इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन करुन संस्थेने ज्ञानशिदोरी विद्यार्थ्यांपर्यत पोहोचवली आहे. असे प्रतिपादन केले.
स्वर्गीय ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या प्रत्येक वाढदिवसाला एक नवी शैक्षणिक शाखा स्थापन करण्याचा दृढ संकल्प त्यांचे सुपुत्र तथा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांनी सन 2021 साली केला होता. दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी, विवेकानंद करिअर ॲकेडेमी, वारुळ या शाखांच्या स्थापना गावडे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली. मातोश्रींच्या निधनानंतरही त्यांचा हा शैक्षणिक वारसा अविरत सुरू ठेवत, त्यांच्या जयंतीदिनी सोळांकूर येथे या नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून श्री. कौस्तुभ गावडे यांनी आपला संकल्प पूर्ण करत मातोश्रींना एक आदरयुक्त आणि अनोखी ज्ञान-श्रद्धांजली वाहिली आहे. सोळांकूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा ज्ञानाचे एक नवे केंद्र ठरेल, असा विश्वास या वेळी मान्यवरांनी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पाटील यांनी ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या जयंती निमित्त गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले व शाळेच्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी मा.कौस्तुभ गावडे यांनी ‘न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल’ साठी दोन इंटरॲक्टिव्ह पॅनेल देण्याची व तीन वर्गखोल्यांसाठी सीलींग करण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थना, दीप प्रज्वलन व ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगी गावडे़ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.आर.एम.कांबळे यांनी केले तर आभार एस.व्ही.नारकर सर यांनी मानले. सूत्रसंचालन श्री.सदाशिव पाटील यांनी केले. यावेळी सोळांकुर मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.




