झायडसने कोल्हापुरात गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्नशील : राजे समरजितसिंह घाटगे
झायडसचे अध्यक्ष डॉ.केयूर पारेख यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी अहमदाबादमध्ये चर्चा
कागल, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकीय परंपरा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगांसाठी पोषक वातावरणाचा विचार करून झायडस कंपनीने येथे प्लांट उभारण्यासह अन्य पायाभूत सुविधा विकसित कराव्यात. कंपनीच्या विविध उपक्रमांसाठी कोल्हापुरातील संधींचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. यासाठी शाहू उद्योग समूहाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य झायडस कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार घाटगे यांनी अहमदाबाद येथील कंपनीच्या प्लांटला भेट दिली. यावेळी झायडस लाइफसायन्सेसचे अध्यक्ष तथा बिझनेस युनिट हेड डॉ. केयूर पारेख, उपाध्यक्ष मनिष, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष कुमार, मार्केट ॲक्सिस अँड इन्स्टिट्यूशनलचे प्रमुख निशू दुबे यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.
झायडससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीने कोल्हापुरात गुंतवणूक केल्यास औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांत रोजगारासाठी गेलेल्या कुशल तरुणांना कोल्हापुरात परतण्याची संधी मिळेल. तसेच बाहेरील तंत्रज्ञ येथे आल्यामुळे बांधकाम, वाहतूक, वाहन व्यवसाय आणि अन्य सेवा क्षेत्रांनाही अप्रत्यक्ष लाभ होईल, असे घाटगे यांनी सांगितले.
झायडसच्या संभाव्य गुंतवणुकीमुळे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळू शकते.या दृष्टीने कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
राजर्षी शाहू स्टार्टअप मिशनच्या कार्यक्रमासाठी झायडसच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण
कोल्हापूरला स्टार्टअप हब बनविण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू स्टार्टअप मिशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या मिशनची माहिती झायडसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच १६ जानेवारी रोजी स्टार्टअप दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या नियोजित कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले.झायडससारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीची गुंतवणूक कोल्हापुरात झाल्यास नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच स्थानिक उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विस्तारालाही चालना मिळेल. कुशल तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला गती मिळेल. या गुंतवणुकीसाठी राजर्षी शाहू स्टार्टअप मिशन आणि शाहू उद्योग समूहाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
छायाचित्र ओळ : अहमदाबाद येथे झायडस कंपनीच्या प्लांट भेटीदरम्यान शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, झायडस लाइफसायन्सेसचे अध्यक्ष तथा बिझनेस युनिट हेड डॉ. केयूर पारेख, उपाध्यक्ष मनिष, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष कुमार आणि मार्केट ॲक्सिस अँड इन्स्टिट्यूशनलचे प्रमुख निशू दुबे.



