श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त शनिवारी (ता.१४) कागलमध्ये शाहू कारखाना पुरस्कृत भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन- अमरसिंह घोरपडे
कागल, प्रतिनिधी.
येथे कागलचे ग्रामदैवत श्री.गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त शनिवारी (ता.१४) भव्य कुस्ती मैदान होणार आहे. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना पुरस्कृत सलग चाळीसाव्या वर्षी होत असलेले हे मैदान येथील ऐतिहासिक यशवंत किल्ला,सांगाव नाका येथे दुपारी तीन वाजता शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल. अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकातील मजकूर असा.शाहू साखर कारखान्याचे संस्थापक सहकारमहर्षी विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून श्री.गहिनीनाथ गैबी पीर उरुसानिमित्त या कुस्ती मैदानाच्या आयोजनास सुरुवात झाली .त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रोत्साहनातून या मैदानाचे आयोजन केले जात आहे.त्यामुळे लोप पावत चाललेल्या कुस्ती कलेला चालना मिळत आहे.
या मैदानात प्रथम क्रमांकासाठी २०२२चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी दोन लढती होणार आहेत. कालीचरण सोलंकर विरुद्ध श्रीमंत भोसले व रोहन रंडे विरुद्ध अभिमन्यू चौधरी यांच्यात या लढती होतील. या मैदानातील अन्य प्रमुख लढतींमधील अभिजीत कापडे(शाहू साखर)विरुद्ध जयदीप पाटील (मोतीबाग)स्वप्निल शेंडे(शाहू साखर)विरुद्ध सुदर्शन पाटील(विभागिय क्रीडा संकुल)यासह नेमलेल्या इतर दोनशेहून अधिक कुस्त्या होणार आहेत. या मैदानास कुस्ती शौकिनानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.



