शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 39 वा स्मृतिदिन
“ ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार ” या उदात्त हेतूने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणणारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक, संवर्धक, ज्ञानतपस्वी, ध्येयवादी समाजशिक्षक आणि द्रष्टे समाजचिंतक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा 39 वा स्मृतिदिन शनिवार दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे संपन्न होत आहे. या समारंभासाठी प्रमुख वक्ते मा. श्री. विवेक सावंत, जागतिक किर्तीचे आय.टी. तज्ज्ञ हे आहेत ते “ ए आय आणि आपण ” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव (प्रशासन) मा. एस. एम. गवळी, संस्थेचे प्रभारी सचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व 13 जिल्हयातील 410 शाखांमधून बहुसंख्य गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करणेत येणार आहे. दुपारच्या सत्रात मुख्याध्यापकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करणेत आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, संस्था प्रार्थना व श्री.महेश हिरेमठ यांच्या सुमधुर गायनाने होईल. या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले आहे.



