Spread the news

शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा ऑगस्ट् 2026  रोजी स्मृतिदिन निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

­

 

 शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे  यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गुरुदेव कार्यकर्त्यांच्या साथीने महाराष्ट्राच्या विविध  जिल्ह्यांमध्ये ज्ञान मंदिरे उघडून येथील सर्वसामान्य जनतेच्या शिक्षणाची सोय केली. हे सर्व करीत असताना त्यांच्या नशिबी मान-अपमान, कष्ट, उपासमार हे सर्व आले पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचविण्याचे कार्य बंद पडू दिले नाही. त्यामुळेच आज महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत बापूजींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे .

  •  

श्री स्वामी विवेकानंद  शिक्षण संस्थेच्या रूपाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अलौकिक कार्याचे स्मरण सर्वांना व्हावे म्हणून दरवर्षी 8 ऑगस्ट् हा दिवस शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा स्मृति दिन म्हणून साजरा केला जातो.  या निमित्ताने महाराष्ट्रभर पसरलेल्या संस्थेच्या विविध ज्ञानमंदिरातून गुरुदेव कार्यकर्ते संस्थेमध्ये  एकत्र येऊन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीचे दर्शन घेतात आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा घेऊन नव्या उमेदीने परत आपापल्या शाखेवर जातात. या प्रसंगी संस्थेच्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी बालवाडी पासून पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय केली.  त्यांनी नुसत्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या नाही तर दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी स्वतः लक्ष घातले व अथक प्रयत्न केले.  परिसरातील गरीब, हुशार अनेकांना मोफत शिक्षण, नोकऱ्या देऊन स्वावलंबी केले व आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.  केवळ स्थानिकच नव्हे तर राज्य परराज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या सं़स्थेच्या शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन करिअर घडवली. बापूजी शिक्षण क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व होते. त्यांनी संपूर्ण जीवनात शैक्षणिक विकासासाठी केलेले कार्य महाराष्ट्रातील जनता कधीही विसरू शकणार नाही.  बापूजींचे व्यक्तिमत्व हिमालयासारखे उत्तुंग होते.  अतिशय प्रेमाने, श्रमाने त्यांनी लोकांना आपले केले व महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यात संस्थेच्या अनेक शाखांची उभारणी केली.  त्यामुळे सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या हृदयात त्यांचे कार्य, आठवण कायम आहे.  बापूजींनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कर्तुत्वाचा शाश्वत ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रेरणांनी संस्था प्रगतीपथावर नेण्याचा वसा संस्थेचे कार्याध्यक्ष साहेब प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कौस्तुभ गावडे सर व गुरुदेव कार्यकर्ते करीत आहेत.

आजच्या युवा पिढीला बापूजींच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मार्गदर्शक ठरू शकतील. सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि त्याग पिळवणूक प्रवृत्तीस आळा या मौलिक निष्ठा जीवनात उतरवण्यासाठी सुसंस्कारी शिक्षण घेतले पाहिजे . आपले आचार विचार व उच्चार हे पवित्र असले पाहिजेत असे त्यांना वाटे.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या या 39 व्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी दि. 8 ऑगस्ट् 2026 रोजी सकाळी 10.30 वा.  प्रमुख वक्ते  मा.श्री. विवेक सावंत, आय.टी. तज्ञ व शिक्षण तज्ञ, एम.डी. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.पुणे  यांचे एआय आणि आपण’  या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे  हे आहेत.   या  कार्यक्रमानंतर दुपारी 2.00 ते 4.30 या वेळेत संस्थेच्या गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

 दीन दलित व बहुजन समाजातील मुला मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा , विद्यार्थी स्वावलंबी व सुसंस्कारी बनावे, त्यांनी स्वतःच्या विकासाबरोबरच समाज व देशाच्या प्रगतीस हातभार लावावा ज्ञानवंत व गुणवंत असे विद्यार्थी घडवणे हे बापूजींचे ध्येय होते आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठीच शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मिळून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जवळपास 410 शाखांद्वारे दहा लाख विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देऊन विद्यार्थी घडवण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे व त्याचेच फलित म्हणून आज पर्यंतच्या 73 वर्षांच्या कालावधीत या संस्थेच्या विविध शाखातून शिकलेले विद्यार्थी आज देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर परदेशातही मोलाची कामगिरी करीत आहेत व संस्थेचे नाव उज्वल करीत आहेत. त्यामुळेच आज ही शिक्षणसंस्था महाराष्ट्रातील एक नामंकित व गुणवंत शिक्षणसंस्था होत आहे.

 बापूजींच्या शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन शासनानेही त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा अशी अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे.  या संस्थेव्दारे इंजिनिअरींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ कॉलेज याचबरोबर अनेक नवनवीन व्यवसायिक अभ्यासक्रम सुरु केले असून आधुनिक शिक्षण देऊन स्वावलंबी व रोजगाराभिमुख विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरु आहे.

संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे हे    संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांसमवेत कार्यरत आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था परिवाराचे श्रद्धास्थान म्हणून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना प्रत्येकाच्या हृदयात एक मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. आज त्यांच्या या स्मृतिदिनी माझे विनम्र अभिवादन.

बापूजी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणणारे दूरदृष्टीचे नेतृत्व होते गरीब दिन दुबळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संधी पोहोचवण्याचा विडा उचलून अनेक ज्ञान शाखाची निर्मिती केली. राज्याच्या विकासात त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे.  त्यांचे कार्य पुढील पिढयांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.  देशाचे भवितव्य शाळांमध्ये घडते. शिक्षण हे केवळ पदवी घेण्याची साधन नसून समाजाला दिशा देण्याचे, चांगले व्यक्तिमत्व घडवण्याची, बौद्धिक ताकद निर्माण करण्याचे प्रभावी अस्त्र आहे. अशी बापूजींची धारणा होती.

आजच्या युवाशक्तीला चांगले शिक्षण कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम देऊन देशाचा अधिक विकास कसा करता येईल. यासाठी गुरुदेव कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. बापूजींनी आयुष्यभर शिक्षणाचा प्रसार व सामाजिक विकास यासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. त्यांचे विचार आणि कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी निर्माण केलेला शैक्षणिक परंपरेतील वसा वारसा पुढील अनेक पिढयांना प्रेरणा देत राहील. त्यांनी शून्यातून शैक्षणिक विश्व निर्माण केले व विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी ज्ञानाची अनेक मंदिर उभारून शिक्षणाचा वटवृक्ष फुलवणारे डॉ. बापूजी साळुंखे यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणा देत राहतील. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.               

                                                                                                                      श्री.  हितेंद्र साळुंखे,

                                                                                                                          सहाय्यक ग्रंथपाल,

                                                                                                                     विवेकानंद काँलेज, कोल्हापूर

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!