ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !

Spread the news

ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !

­

 

ट्युमरचे तात्काळ निदान करून रुग्णांना काही क्षणात रिपोर्ट देणाऱ्या अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण सोहळा सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे निमान्सच्या (NIMHANS) न्यूरोपॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख आणि जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिता महादेवन यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, पॅथॉलॉजी प्रमुख डॉ.प्रतिमा मरजक्के प्रमुख उपस्थित होते.

  •  

शस्त्रक्रियेदरम्यान काढलेला ट्युमर कर्करोगाचा आहे की नाही किंवा कर्करोगाचा संपूर्ण भाग काढला गेला आहे की नाही, या महत्त्वाच्या प्रश्नाला डॉक्टराना (शल्यचिकित्सकांना) अनेकदा सामोरे जावे लागते. असा काढलेला ट्युमर सर्वसाधारण पॅथॉलॉजी प्रक्रियेला अहवाल (रिपोर्ट) तयार करण्यासाठी ३ ते ४ दिवस लागू शकतात, तर क्रायोस्टॅट मशीन वापरून फ्रोजन सेक्शन तंत्रज्ञानाद्वारे अंदाजे १०-१५ मिनिटांत आवश्यक माहिती मिळते. त्यामुळे शस्त्रक्रिया करत असतानाच डॉक्टर रुग्णावर आवश्यक ते पुढील उपचार तात्काळ करू शकतात व रुग्णाला दिलासा मिळू शकतो. यामुळे ट्यूमरचे स्वरूप आणि सर्जिकल मार्जिनबद्दल त्वरित निर्णय घेण्यास मदत होते. म्हणूनच क्रायोस्टॅटला खऱ्या अर्थाने “सर्जिकल पॅथॉलॉजीसाठीचे आपत्कालीन साधन” म्हटले जाऊ शकते.

मेंदूचे ट्यूमर ३०० पेक्षा जास्त प्रकारचे आहेत, ते अनेकदा एकमेकांसारखेच दिसतात. केवळ एच अँड ई (H&E) स्टेनिंगद्वारे ट्यूमरचे अस्तित्व कळू शकते, तर आयएचसी (IHC) त्याचा प्रकार, ग्रेड आणि उपचारासंबंधी महत्त्वाची माहिती अधिक अचूकपणे निश्चित करण्यास मदत करते. इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री किंवा आयएचसी (IHC) न्यूरोपॅथॉलॉजीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते.

डॉ. अनिता महादेवन या बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस (NIMHANS) मध्ये न्यूरोपॅथॉलॉजी विभागाच्या विभागप्रमुख आणि प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रात त्यांचा व्यापक अनुभव आणि महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या विशेष प्राविण्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये न्यूरोपॅथॉलॉजी, न्यूरोइन्फेक्शन, अपस्माराशी संबंधित न्यूरोपॅथॉलॉजी, पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि मेंदूच्या ऊतींवरील संशोधन व ब्रेन बँकिंग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. त्यांच्या हस्ते ह्या मशीनचा लोकार्पण सोहळा विशेष महत्वपूर्ण आहे.

डॉ. शिवशंकर मरजक्के ह्यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल येथील न्युरो विभागाला जागतिक स्तरावर नेले आहे, ह्या मशीनमुळे अशा स्वरूपाच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेला अधिक स्पष्टता येणार आहे. ह्या अत्याधुनिक मशीन ट्रस्ट श्रेणीत कोल्हापुरात पहिल्यांदा सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित होत आहे. अशा टेस्ट करिता सर्वसाधारणपणे १५ हजारांचा खर्च येतो पण ह्याच तपासणी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर केवळ ५ ते ६ हजारात होणार असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पॅथॉलॉजी प्रमुख डॉ.प्रतिमा मरजक्के यांनी यावेळी केले. या लोकार्पण सोहळ्याला सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकश भरमगौडर, डॉ. अंकुश पार्टे, डॉ. तनिष पाटील, डॉ. प्रशांत नाडेकर, डॉ. शंतनू पालकर, डॉ. सचिन पाटील, डॉ. विशाल खलाटे यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!