एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ए. आय. सी. टी. इ. – अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन.
एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी (E&TC) विभागाच्या वतीने “डिजिटल ग्रीन रिव्होल्युशन इन ॲग्रिकल्चर : प्रिसिजन फार्मिंग टू ॲग्रि-एक्सपोर्ट” या विषयावर ए. आय. सी. टी. इ. – अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) चे उद्घाटन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर डॉ. मौसमी वंजाळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे यावेळी सत्कार व स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. विवेक भोईटे, वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर श्री. विकास दांगट, डायरेक्टर, एस. व्ही. ग्रुप ऑफ कंपनीज हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच श्री. यशवंत जगदाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि संजीवनी जोगळेकर, NGO क्षेत्रातील प्रतिनिधी, यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून आपले मार्गदर्शन केले.
या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा मुख्य उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), सेन्सर्स, ऑटोमेशन आणि प्रिसिजन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी वापर करण्यास प्राध्यापक व संशोधकांना प्रोत्साहित करणे हा आहे.
या FDP अंतर्गत स्मार्ट फार्मिंग, प्रिसिजन ॲग्रीकल्चर, पीक निरीक्षण, स्वयंचलित तंत्रज्ञान, काढणीनंतरचे व्यवस्थापन (Post-Harvest Management), कृषी पुरवठा साखळी (Supply Chain) आणि कृषी निर्यात (Agri-Export) यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन व ज्ञानाची देवाणघेवाण करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील उत्पादकता, कार्यक्षमता, शाश्वतता आणि मूल्यवर्धन वाढविण्याच्या विविध संधींचा या कार्यक्रमात अभ्यास केला जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकी, कृषी, उद्योग, संशोधन संस्था आणि सामाजिक क्षेत्र यांच्यात आंतरशाखीय सहकार्य, तांत्रिक नवोपक्रम आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे मानद सचिव श्री. मालोजीराजे छत्रपती आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच मुख्य समन्वयक डॉ. मौसमी वंजाळे आणि सहसमन्वयक डॉ. वर्षा पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.



