सृजनरंग २०२६ अंतर्गत साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ७३ महाविद्यालयांतील १२५ विद्यार्थ्यांचा सहभाग

Spread the news

सृजनरंग २०२६ अंतर्गत साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

­

 

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ७३ महाविद्यालयांतील १२५ विद्यार्थ्यांचा सहभाग

  •  

पुणे, दि. १० ऑक्टोबर २०२६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सहकार्याने एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे ‘सृजनरंग २०२६’ या पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ७३ महाविद्यालयांमधील १२५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका व निर्मात्या शिल्पा बल्लाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. गणेश भामे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. सविता इटकळकर, तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी व जिल्हा समन्वयक डॉ. नाना एन. शेजवळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. नाना एन. शेजवळ यांनी ‘सृजनरंग २०२६’ या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक व सर्जनशील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आणि सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशीलता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमाने यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या परंपरेचा आढावा घेतला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वारशाचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि समाजसेवेच्या संस्कारांना चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. सविता इटकरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. रासेयो मधील सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, सामाजिक जाणीव आणि सेवाभाव विकसित होतो. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. गणेश भामे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रासेयो उपक्रमांचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थ्यांना समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव जोपासणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुण्या शिल्पा बल्लाळ यांनी समाजाच्या विकासात कला, साहित्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे महत्त्व स्पष्ट केले. रासेयो स्वयंसेवक समाजातील विविध प्रश्न समजून घेऊन लोकजागृती आणि समाजहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा उपयोग समाजाच्या सकारात्मक परिवर्तनासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सृजनरंग २०२६ अंतर्गत स्वरचित कविता लेखन व वाचन, निबंधलेखन, वक्तृत्व, भित्तिचित्र, पोवाडागायन आणि पथनाट्य अशा विविध साहित्यिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी सामाजिक आशयाशी संबंधित विषय निश्चित करण्यात आले होते. नशामुक्त भारत, युवकांची सामाजिक जबाबदारी, महात्मा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य, जल-जमीन-जंगल संवर्धन, विकसित भारत २०४७, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जनजागृती अशा विषयांमधून विद्यार्थ्यांना आपल्या विचारांची आणि कलागुणांची प्रभावी अभिव्यक्ती करण्याची संधी मिळाली.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे रासेयो, कार्यक्रम अधिकारी आपल्या स्वयंसेवकांसह उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवकांनी केले. प्रा. डॉ. ए. बी. पाटील, डॉ. पंकज अगलावे, डॉ. पंकज मोडक, डॉ. मिलिंद स्वामी, डॉ. सुमेध चिवंडे, श्री. संजय मालती कमलाकर, विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा आणि नील, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.

सृजनरंग २०२६’ हा उपक्रम पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा, सामाजिक जाणीव समृद्ध करणारा आणि युवकांमध्ये सर्जनशीलता व सेवाभाव वाढविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!