द्वितीय महाराष्ट्र राज्य मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर, दि. २३ ऑगस्ट २०२६ :
कोल्हापूर येथील CSIBERच्या आनंद भवन बेसमेंट हॉलमध्ये दि. २१, २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वितीय महाराष्ट्र राज्य मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ३०० खेळाडू व प्रवेशिका या स्पर्धेत सहभागी झाल्या.
या स्पर्धेत ४० वर्षांवरील पुरुष व महिला, ४५+, ५०+, ५५+, ६०+, ६५+, ७०+, ७५+ अशा विविध वयोगटांमध्ये पुरुष व महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या, तसेच ८० वर्षांवरील पुरुष गटाचीही स्पर्धा आयोजित करण्यात आली. याशिवाय ४० ते ६० वर्षे आणि ६० वर्षांवरील अशा दोन गटांमध्ये सांघिक स्पर्धाही घेण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून खेळाडूंनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, गोंदिया, नागपूर आदी जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मास्टर्स खेळाडू सहभागी झाले.
पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये टेबल टेनिसचे वातावरण अधिक बळकट करणे, ज्येष्ठ खेळाडूंचा सहभाग वाढविणे आणि खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश होता.
या स्पर्धेचे आयोजन SAS Sports Managementच्या वतीने करण्यात आले. या संस्थेमध्ये टेबल टेनिस क्षेत्रातील अनुभवी खेळाडूंचा समावेश असून, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पा जोशी, राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू आशा चव्हाण आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या श्रुती जोशी यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला.
ही स्पर्धा MSTTA, MVTTC आणि KDTTA यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पार पडली.
कोल्हापूरच्या प्रशिक्षकांचा विशेष सन्मान
पारितोषिक वितरण समारंभादरम्यान कोल्हापूरच्या टेबल टेनिस क्षेत्रातील प्रशिक्षकांचेही विशेष कौतुक करण्यात आले. कोल्हापुरातील खेळाडूंना सातत्याने प्रशिक्षण देणे, त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आणि कोल्हापूरच्या टेबल टेनिस खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या NIS प्रशिक्षक व राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू सौ. अनिंदिता बसाक तसेच राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व प्रशिक्षक श्री. संग्राम चव्हाण यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कोल्हापूरमध्ये टेबल टेनिसची पायाभरणी मजबूत करण्यासाठी तसेच खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी या दोन्ही प्रशिक्षकांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेदरम्यान तसेच पारितोषिक वितरण समारंभास MSTTAचे अध्यक्ष श्री. प्रविण लुंकड, MVTTC चे अध्यक्ष श्री. राजीव बोडस व सौ. स्मिता बोडस, अर्जुन पुरस्कार विजेत्या सौ. शैलजा साळोखे, North Starचे चेअरमन डॉ. दीपक जोशी तसेच Korgaonkar Groupच्या चेअरमन सौ. पल्लवी कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विविध गटांतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी CSIBER Group तसेच सर्व प्रायोजक, पदाधिकारी, पंच, स्वयंसेवक, प्रशिक्षक आणि सहभागी खेळाडूंचे आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी सौ. श्रुती जोशी यांनी सर्व प्रायोजक व CSIBER Groupचे मनःपूर्वक आभार मानले. पश्चिम महाराष्ट्रात टेबल टेनिसचा प्रसार आणि खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः कोल्हापूर, सांगली व सातारा परिसरात मास्टर्ससह सर्व वयोगटातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
स्पर्धेचे विविध गटांतील निकाल सोबत जोडण्यात आले आहेत.
— SAS Sports Management
कोल्हापूर



