*ठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे*
*मतदारांना मानसिक दबावाखाली ठेवणे हा लोकशाहीचा खून :*
*कोल्हापूर :* बाळूमामा आणि हालसिद्धनाथ हे लाखो कष्टकरी शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या पवित्र भंडाऱ्याचा वापर गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीत मत सुरक्षित ठेवण्यासाठी ‘बॉण्ड पेपर’सारखा करणे ही देवांची विटंबना नाही का? असा सवाल करत गोकुळच्या ठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची नामुष्की महायुतीच्या नेत्यांवर आल्याची टीका भाकपाचे सरचिटणीस सतिशचंद्र कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात पुढे म्हणले आहे की, राज्याच्या सहकार आणि दूध क्षेत्रातील सर्वात मोठा रणसंग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीने अत्यंत खालच्या आणि संतापजनक पातळीवर ही निवडणूक नेऊन पोहचवली आहे. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कर्मकांड, अनिष्ठ रुढी-परंपरा आणि अंधश्रद्धेविरुद्ध आयुष्यभर लढा दिला त्याच करवीरनगरीत सत्तेसाठी अंधश्रद्धेला उघडपणे खतपाणी घातले जात आहे. गोकुळच्या मतदानावर पकड ठेवण्यासाठी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून ठरावधारकांना थेट देवाच्या शपथा घ्यायला लावल्या जात आहेत. यामुळे कोल्हापुरच्या पुरोगामी आणि वैचारिक ओळखीलाच काळिमा फासण्याचे काम महायुतीकडून सुरु आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत बाळूमामाचा भंडारा आणि अप्पाचीवाडी (ता. चिक्कोडी) येथील श्री हालसिद्धनाथाचा पवित्र भंडारा तसेच राधानगरीतील जागृत देवस्थान विठलाई देवीचा अंगारा हातामध्ये देऊन आम्ही महायुतीच्याच पॅनेलला मतदान करणार अशी शपथ घेण्यास ठरावधारकांना बळजबरीने भाग पाडले जात आहे. ग्रामीण भागातील ठरावधारक देवाच्या कोपाच्या भीतीने या दबावाखाली येत असून त्यांच्या कौटुंबिक आणि मानसिक आरोग्याशी महायुतीचे नेते एक प्रकारे खेळ करत असल्याचे चित्र आहे. जर तुमच्याकडे ४४०० ठराव असतील तर मग मतदारांवर विश्वास न ठेवता अशा प्रकारे शपथा घ्यायला लावण्याची नामुष्की का आली? कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी विचारांचे नेतृत्व करणारा जिल्हा राहिला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर ज्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी संघर्ष केला, तो कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात असतानाही गोकुळच्या निवडणुकीत राजरोसपणे त्याचा भंग होताना दिसत आहे. सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी थेट मतदारांच्या धार्मिक भावनांचा आणि विश्वासाचा बाजार मांडला असल्याचा आरोप सतिशचंद्र कांबळे यांनी या पत्रकात केला आहे.
*चौकट :*
महायुतीच्या नेत्यांना आमचे काही सवाल
-शाहूंच्या नगरीत कर्मकांडाचे उदात्तीकरण का? पुरोगामी कोल्हापूरची मान संपूर्ण जगात शैक्षणिक व सामाजिक क्रांतीसाठी उंचावली आहे, तिथे सत्तेसाठी मतदारांना अंधश्रद्धेच्या विळख्यात ढकलणे नेत्यांना शोभते का?
-एखाद्याला बळजबरीने देवाचा भंडारा शिवायला लावून शपथ घेणे हा कायद्यानुसार गुन्हा असताना, पोलीस प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी यावर स्वतःहून गुन्हे दाखल का करत नाहीत?
-मतदारांचे स्वातंत्र्य हिरावण्याचा अधिकार महायुतीच्या नेत्यांना कोणी दिला? लोकशाहीत गुप्त मतदान पद्धतीचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्याचे हनन करून मतदारांना मानसिक दबावाखाली ठेवणे हा लोकशाहीचा खून नाही का?



