पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून दया; एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : आमदार राजेश क्षीरसागर

Spread the news

*पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून दया; एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : आमदार राजेश क्षीरसागर*

­

 

*शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या विशेष मोहिमेला कसबा बावड्यातून सुरुवात; शहरात विविध ठिकाणी अर्ज वाटप शिबिरांचे आयोजन*

  •  

कोल्हापूर दि.१९ : गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून महायुती शासनाने शासकीय जमिनीवरील पात्र झोपडपट्टीधारकांची अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत अर्ज वाटप शिबिरांची सुरुवात आज कसबा बावडा येथे करण्यात आली. याठिकाणी संकपाळनगर, मातंग वसाहत, भगतसिंग वसाहत आणि धान्य गोदाम जवळील झोपडपट्टी धारकांना अर्जांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, शहरातील शासकीय जमिनींवर वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे, यासाठी यापूर्वी महानगरपालिकेच्या विविध बैठकांमध्ये सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. या प्रक्रियेत संबंधित जागांची मोजणी करण्याचा महत्त्वपूर्ण विषय समोर आला. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार स्वनिधीतून तब्बल ८३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत जागा मोजणीचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे.

ते पुढे म्हणाले की, अनेक वर्षांपासून झोपडपट्टीधारकांचे प्रश्न प्रलंबित असताना यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने का लक्ष दिले नाही, असा प्रश्न पडतो. राजकारणापेक्षा सर्वसामान्य माणसांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना मूलभूत हक्क मिळवून देणे याला प्राधान्य असले पाहिजे. हेच महायुती शासनाचे धोरण आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयाचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि गतीने काम करणे आवश्यक आहे.

महानगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, या कामासाठी मतदारसंघाची सीमा किंवा राजकीय भेदभाव न पाहता संपूर्ण कोल्हापूर शहरातील शासकीय जमिनीवरील पात्र झोपडपट्टीधारकांचा विचार करण्यात यावा. शहरातील ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमिनीवर अतिक्रमणे आहेत, त्या सर्व ठिकाणांची प्रक्रिया प्राधान्याने हाती घेऊन सातत्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करावी. पात्र झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय कार्यवाहीला गती द्यावी. शहरातील एकही पात्र झोपडपट्टीधारक या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी.

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेच्या माध्यमातून आज कसबा बावडा येथे अर्ज वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून पात्र झोपडपट्टीधारकांना अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आगामी काळात शहरातील विविध भागांमध्ये अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, संबंधित भागातील पात्र नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरातील गोरगरीब नागरिकांना केवळ आश्वासने न देता त्यांना हक्काचे घर आणि मालमत्तेचा अधिकृत अधिकार मिळवून देणे ही आमची भूमिका आहे. शासकीय जमिनीवरील प्रत्येक पात्र झोपडपट्टीधारकाला त्याचे हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील. एकही पात्र नागरिक या हक्कापासून वंचित राहणार नाही, असा ठाम निर्धार आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

यावेळी उपायुक्त नागेंद्र मुटकेकर, कार्यकारी अभियंता रावसाहेब चव्हाण, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, प्रधानमंत्री आवास योजना सामाजिक विकास विशेतज्ञ युवराज जबाडे, शिवसेना समन्वयक सुनिल जाधव, कृष्णा लोंढे, कपिल पोवार आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!