आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधन

Spread the news

आयुर्वेदाचार्य
डॉ. सुनील पाटील यांचे निधन

­

 

कोल्हापूर, ता. १४ ः येथील प्रसिध्द आयुर्वेदाचार्य, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील बंडोपंत पाटील (वय ६६) यांचे आज निधन झाले. सकाळी साडेदहाच्या सुमारास ताराबाई पार्क येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, बहिण, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.१६) सकाळी नऊ वाजता आहे.
करवीर तालुक्यातील वडणगे येथे सामान्य शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी आयुष्यभर शुध्द आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारासाठी काम केले. १९८३ मध्ये शिवाजी विद्यापीठाची ‘बीएएमएस आयुर्वेदाचार्य’ ही पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने मिळवली. शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना विविध विद्यार्थी चळवळीतही ते अग्रेसर राहिले. वनौषधी विद्यापीठ संस्थेच्या माध्यमातून वनौषधी या विषयाला वाहिलेले एकमेव मासिक व दिवाळी अंक त्यांनी सुरु केला. संस्थेच्या माध्यमातून जगभरातील वीसहून अधिक देशात त्यांनी आयुर्वेद प्रसारासाठी परिषदा घेतल्या. नाडीवैद्य आणि पंचकर्म तज्ञ म्हणूनही ते सर्वपरिचित होते. यकृत विकार, हिपॅटायटिस बी, कर्करोगासह विविध विकारांवर संशोधनातून त्यांनी विविध आयुर्वेद उपचार पध्दती विकसित केल्या.
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या वैद्यक परिषदेवर अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी गैरमार्गाने नोंदणी केलेल्या वैद्यकिय व्यावसायिकांविरोधात मोहिम उघडली. त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. वैद्यकीय व्यावसायिक असले तरी राजकारण हा त्यांच्या आवडीचा विषय राहिला. स्थानिक राजकारणात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला. माध्यमांसाठीही त्यांनी विपुल लेखन केले. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. चेतना अपंगमती विद्यालय या विशेष मुलांच्या शाळेबरोबरच विविध सामाजिक संस्थांतून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टच्या माध्यमातून माध्यमात उल्लेखनीय काम केलेल्यांचा गौरव आणि पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपक्रमही त्यांनी सुरु केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातूनही ते काही काळ कार्यरत राहिले. भावातीत ध्यानाचे प्रणेते महर्षी महेश योगी यांच्या मार्गदर्शनाखाली भावातीत ध्यान समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवण्यासाठीही ते अग्रेसर राहिले. नेंदरलॅंड येथे महर्षी विद्यापीठाच्या माध्यमातून काही काळ त्यांनी काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेवून युरोप येथे सर्बियन असोसिएशन ऑफ आयुर्वेद संस्थेच्या वतीने त्यांनी महर्षी महेश योगी स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयुर्वेद, पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनीही त्यांचा सन्मान झाला. ‘आरोग्यासाठी आयुर्वेद’, ‘स्वयंपाकघरातील डॉक्टर’, ‘फलौषधी‘, ‘पंचकर्म’, ‘माणसं मनातली‘, ‘काश्मिर एक नजराणा‘, ‘महर्षी महेश योगी‘, ‘आयुर्वेदयात्री‘ आदी त्यांची पुस्तके गाजली. ‘वडणग्याचं पोरगं‘ हे त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!