झाडांचा श्वास मोकळा करा आणि जमीन रिचार्ज करून भूजल पातळी वाढवूया मोहीम लोकचळवळ व्हावी …
प्रतिनिधी :
झाडांचा श्वास मोकळा करा आणि जमीन रिचार्ज करून भूजल पातळी वाढवूया ही मोहीम लोक चळवळ व्हावी. या मोहिमेला कोल्हापूर महानगरपालिका संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त राजेंद्र भारुड यांनी दिले.
यावेळी ताराबाई गार्डन परिसरातील झाडांच्या बुंध्याला पडलेले डांबर त्यांच्या हस्ते काढून झाडांना आळे करण्यात आले.
यावेळी महापौर आणि आयुक्त यांनी चला आपण सर्वांनी मिळून आपल्या शहरातील वॉर्डातील रस्त्याच्या बाजूला असणारे झाड , विविध कार्यालय , गार्डन आदी जिथे जिथे झाड असेल तेथील प्रत्येक झाडाच्या भोवती दीड ते दोन फूट लांब तितकेच खोल खड्डा काढून झाडांचा श्वास मोकळा करून झाडाला आळे करावे. ही मोहीम लोक चळवळ बनवूया आणि पुढील दिवसात पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवू आणि शहराची भूजल पातळी वाढवूया असे आवाहन केले.
“कोल्हापूरचा पारा @41अंश ते पुन्हा @36 अंश करणे” ही पर्यावरण चळवळ आझाद हिंद मार्फत जिल्ह्यात सुरु केली आहे. त्या पर्यावरण चळवळीमध्ये कोल्हापूर महापालिका सहभागी झाली आहे.
यावेळी अध्यक्ष राहुल मगदूम माहिती देताना म्हणाले की, झाडांची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची जमिनीखालची पाईपलाईन आहे. त्याचा उपयोग करून भूजल पातळी वाढवून जमीन रिचार्ज केली पाहिजे. शहरातील पाच लाख झाडांना दीड ते दोन फूट रुंद आणि खोल आळे केले पाहिजे. त्यामधून दिवसाला किमान शंभर लिटर पाणी जमिनीत मुरले आणि जर पाऊस पन्नास दिवस पडला असे अनुमान लावले तर दोन हजार पाचशे कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवू शकतो.
मगदूम पुढे म्हणाले, गेल्यावर्षी मे महिना ते नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता.तरीही यावर्षी पाण्याच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भविष्यातील पाण्याचा धोका ओळखून ही मोहीम गेल्या वर्षी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सुरू केली आहे. वाढलेले तापमान, पाणी टंचाई आणि प्रदूषण यावर गंभीर होणे आवश्यक आहे. आपली पुढची पिढी शाबूत ठेवायची तर यावर गांभीर्याने सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.कृपया सर्वांनी या मोहिमेत सहभागी होवून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांना आळे करावे असे आवाहन राहुल मगदूम यांनी केले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम आणि आयुक्त राजेंद्र भारुड, उप आयुक्त शिल्पा दरेकर तसेच संयोजक आझाद हिंद नेचर आर्मी व आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
यावेळी उप आयुक्त रविकांत आडसुळ,
परितोष कंकाळ,नगरसेविका दीपाली घाटगे यांनी भेट दिली. कार्यक्रमास जेष्ठ वनस्पती तज्ञ सुहास वायगंणकर,आझाद हिंदचे सुनील मुळे, परितोष उरकुडे, नितीन कांबळे, निलेश नाडगोंड यांच्यासह विवेकानंद कॉलेजच्या सहा महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी कॅडेट उपस्थित होत्या.
चौकट
“झाडांचा श्वास मोकळा करा आणि भूजल पातळी वाढवून जमीन रिचार्ज करा ” अशी मोहीम आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी कोल्हापूर यांच्या वतीने गेल्यावर्षी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सुरू केली आहे. पण विभागाचा विलंब आणि मे महिन्यात सुरू झालेला पाऊस यामुळे पूर्ण होवू शकली नव्हती. पण यावर्षी महापौर, आयुक्त, सर्व उप आयुक्त ,उप महापौर,शहर व जल अभियंता आणि सर्व पदाधिकारी, समिती सदस्य, नगरसेवक यांनी ही मोहीम संपूर्ण वॉर्ड पद्धतीने पूर्ण करू असे आझाद हिंदच्या सदस्यांना आश्वासीत केले आहे.





