*छत्रपती ‘शाहूं’च्या कागलची मान अक्षय ढेरेच्या सुवर्ण कामगिरीने उंचावली–राजे समरजितसिंह घाटगे*
*आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल शाहू साखर कारखान्यातर्फे यथोचित सत्कार*
कागल, प्रतिनिधी :
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील एकोंडी (ता. कागल) येथील कुस्तीपटू अक्षय ढेरे याने व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून कागलसह कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या यशाने छत्रपती शाहू महाराजांच्या कागलची मान उंचावली आहे.असे गौरवोद्गार शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले.
येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या हस्ते अक्षय ढेरे याचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्री.घाटगे पुढे म्हणाले, “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरची कुस्ती परंपरा जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राजाश्रय दिला. त्यांच्या प्रेरणेतून घडलेल्या एकोंडीसारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अक्षय ढेरे याने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून छत्रपती शाहू महाराजांच्या कुस्ती परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव केला आहे.
स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनीही कुस्ती क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या विचारांचा आणि परंपरेचा वारसा पुढे नेताना अशा होतकरू खेळाडूंना बळ देणे हा आमचा राजधर्म आहे. अक्षयसारख्या खेळाडूंमुळे ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा मिळत असून भविष्यात तो ऑलिम्पिकमध्येही भारताला पदक मिळवून देईल, असा विश्वास आहे.
सत्काराला उत्तर देताना सुवर्णपदक विजेता अक्षय ढेरे म्हणाला,छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार होणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कागल, कोल्हापूर आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी अधिक मेहनत घेण्यासाठी बळ मिळाले आहे.यापुढे देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हेच माझे पुढील ध्येय आहे.”
यावेळी त्याचे वडील तानाजी ढेरेसह कुस्तीप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
कागल येथे आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेल्या अक्षय ढेरे याच्या सत्कारवेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे




