कॉ. गोविंद पानसरे विचार संमेलनात ठराव; ६ जूनला ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन, सावरकरांवर गुन्ह्याची मागणी

Spread the news

शिवराज्याभिषेक दिनी 6 जूनला ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे बिंदू चौकात जाहीर सामुहिक वाचन
सावरकर, भालजी पेंढारकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि लता मंगेशकर यांचा ‘भारतरत्न’ सन्मान परत घ्यावा
पहिल्या कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलनात ठराव

­

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेतील मूळ भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 6 जून रोजीच्या शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापूरच्या बिंदू चौकात विविध जाती धर्मातील हजारो लोक एकत्र येऊन ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करतील असा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि सत्यशोधक इतिहास परिषद यांच्या वतीने पहिले कॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी पार पडले. या संमेलनात वरील ठरावासह इतर चार ठराव मंजूर करण्यात आले ते असे ठराव : 1 समान न्याय व पुरस्कारांची वापसी : जर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या लेखनावर आक्षेप असेल, तर त्याच निकषावर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल वि. दा. सावरकर आणि भालजी पेंढारकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि लता मंगेशकर यांचा ‘भारतरत्न’ सन्मान परत घ्यावा. ठराव : 2 महाराष्ट्र भूषण रद्द करावा : बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील शिवचरित्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार तातडीने काढून घ्यावा. ठराव : 3 कॉम्रेड गोविंद पानसरे अध्यासन केंद्र : श्रमिकांच्या लढ्यातील योगदानाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ‘कॉम्रेड गोविंद पानसरे अध्यासन’ स्थापन करावे. ठराव : 5 लोकसभागातून चित्रपट निर्मिती : कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे कार्य आणि विचार जनमानसात रुजवण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित ‘कॉम्रेड अण्णा’ या भव्य चित्रपटाची लोकसभागातून निर्मिती करण्याचा संकल्प करण्यात येत आहे.
तत्पूर्वी अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी कामांचा वारसा सोईस्करपणे विसरून केवळ जात, धर्म आणि सोईच्या राजकारणासाठी शिवचरित्राची मांडणी आता सुरू आहे. अठरापगड जातीच्या लोकांची व्यवस्था म्हणजे शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे. आमक्याने लिहिले म्हणून प्रमाण न मानता त्यातील गाभा समजून घेऊन समाज बांधणी आवश्यक आहे. हा इतिहास सांगणे आवश्यक आहे. आमदार संजय गायकवाड सारख्या लोकांना अशा गोष्टी आता जाणीवपूर्वक समजून सांगाव्या लागतील, धाक, दडपशाहीने खरा इतिहास पुसता येत नाही, त्यासाठी मुळातला विचार समजून घेणे आवश्यक आहे.
संमेलनाध्यक्ष इतिहास संशोधक आणि लेखक डॉ. कपिल राजहंस म्हणाले, एकाने उभे केलेला खोट्या इतिहासाचा डोंगर झाकण्यासाठी दुसऱ्याने त्याच्यापेक्षा मोठ्या खोट्या इतिहासाचा डोलारा उभा करणे म्हणजे सत्यान्वेषण नव्हे. शिवचरित्राची लोककल्याणकारी विचारधारा समाजाच्या कल्याणासाठी वापरायची असेल तर येणाऱ्या काळात समाज जोडणारी शिवचरित्राची चळवळ जातीपातीच्या पलीकडे जाऊन घराघरात पोहोचवले पाहिजे.
स्वागताध्यक्ष आंबेडकरवादी नेते उत्तमदादा कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली. अ‍ॅड. करुणा विमल यांनी ठरावाचे वाचन केले. कवी संमेलनाध्यक्ष विद्रोही कवी पि. के. यांच्या कवितेचे सादरीकरण झाले.
प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, विश्वास तरटे, मदन पवार, सुनील जाधव यांनी मनोगते व्यक्त केली.
सदर विचार संमेलनास महाराष्ट्रातील विविध भागातून लेखक, साहित्यिक, विचारवंत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवतावादी संस्कृती चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर यांनी केले.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!