पंतप्रधान मोदींकडून बजाज समूहाच्या वारशाचा गौरव
पुढील ५ वर्षांत २ कोटी तरुणांना कौशल्य विकासाशी जोडण्याचे उद्दिष्ट
कोल्हापूर दि. १२ (प्रतिनिधी) : भारतीय उद्योजकतेचा कणा आणि विश्वासाचे दुसरे नाव असलेल्या बजाज समूहाने आपल्या व्यवसायाची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. १४८ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे मार्केट कॅप असलेल्या या समूहाने केवळ व्यापारच केला नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते आधुनिक भारताच्या आर्थिक उत्थानापर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या ऐतिहासिक प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजाज परिवाराचे अभिनंदन करताना समूहाच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव केला. “कोणत्याही संस्थेसाठी शंभर वर्षांचा प्रवास हा केवळ काळ नसून तो बदलत्या काळाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे. बजाज समूहाने केवळ रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत, तर नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे देशाला स्वावलंबी बनवण्यात मोठे योगदान दिले आहे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात भावना व्यक्त केल्या. तसेच बजाज समूहाने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत १० दशलक्षाहून अधिक लाभार्थ्यांचे जीवन उजळले असून, पुढील ५ वर्षांत २ कोटी तरुणांना कौशल्य विकासाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्यात उद्योजक, राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. १९२६ मध्ये स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांनी मुंबईत या समूहाची मुहूर्तमेढ रोवली होती. महात्मा गांधींचे ‘पाचवे मानसपुत्र’ मानल्या जाणाऱ्या जमनालालजींच्या तत्त्वांवर आधारित हा समूह आज भारतातील दर तीनपैकी एका घरापर्यंत पोहोचला आहे. १ लाख ३० हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या या समूहाने आता आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
या सोहळ्यात बजाज समूहाच्या नेतृत्वाने भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला. बजाज ऑटोचे अध्यक्ष नीरज बजाज म्हणाले की, “बजाज आणि भारताची कथा कधीच वेगळी नव्हती. आमचे संस्थापक जमनालालजींचा ‘स्वतःच्या फायद्यापेक्षा समाजहित महत्त्वाचे’ हा विचार आजही आमचा मार्गदर्शक आहे. आम्ही ‘मेक इन इंडिया’वर तेव्हापासून विश्वास ठेवला जेव्हा तो शब्दही अस्तित्वात नव्हता.” याच प्रवासाला जागतिक पातळीवर नेणारे राजीव बजाज यांनी नमूद केले की, आज बजाज केवळ भारतीय कंपनी राहिलेली नाही, तर आफ्रिका ते लॅटिन अमेरिकेपर्यंत १०० हून अधिक देशांत आमची उत्पादने धावत आहेत. पल्सरसारखे ब्रँड आज जागतिक स्पर्धेत आघाडीवर आहेत, हे भारताच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक आहे.
संजिव बजाज यांनी तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर देताना सांगितले की, पुढील १०० वर्षे ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि आर्थिक समावेशनाची असतील. तसेच, शेखर बजाज यांनी समूहाच्या सामाजिक बांधिलकीची आठवण करून दिली. केवळ नफा कमावणे हा उद्देश नसून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रगती पोहोचवणे हेच बजाज समूहाचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शताब्दी सोहळ्यानिमित्त ‘कथनी करणी एकसी’ हा लघुपट आणि ‘१०० इयर्स ऑफ बजाज’ या विशेष बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले .




