एलिक्झा पार्कच्या पिछाडीस असलेली कोल्हापूर महानगरपालिकेची खुली व मोक्याची जागा सुरक्षित व विकसित करावी
– भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांचे आयुक्त यांना निवेदन
कोल्हापूर दि. १२ एलिक्झा पार्कच्या पिछाडीस कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावावर असणारी एकूण ७९४६.२३ चौरस मीटर इतकी जागा आहे. या खुल्या जागेची रेडीरेकनर प्रमाणे २१ कोटी रुपये किंमत होते तसेच बाजार भावाप्रमाणे या जागेची जवळजवळ ६० ते ७० कोटी रुपये किंमत होते. परंतु दुर्दैवाने कोल्हापूर महापालिकेच्या या जागेवर अनेक फोर व्हीलर गाड्या मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पद्धतीने पार्किंग करण्यात येत आहेत. सदरच्या जागे शेजारी सोळा मजली इमारत व अतिशय मोक्याची असलेली हि जागा असताना कोल्हापूर महापालिकेला सोन्याचा दर मिळणार असणाऱ्या जागेचा लाभ घेता येत नाही आहे हे दुर्दैव आहे.
तसेच सदरची जागा बॅडमिंटन कोर्ट साठी प्रस्तावित असल्याचे समजते परंतु हि जागा फक्त बॅडमिंटन कोर्ट साठी न देता तेथील सर्व सामान्य नागरिकांना सर्व सोयींयुक्त उपयोग होईल असा उपक्रम करून, अॅमिनिटीज उपलब्ध करून सदर जागेवर कमर्शियल बिल्डींग उभारून महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी यासंदर्भात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आयुक्त मा. राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, सदर जागेवर आजू बाजूच्या इमारत लक्षात घेऊन प्रस्तावित प्लॅन तयार करून योग्य अशा कमर्शियल पी.पी.पी पद्धतीने बिल्डींग बिल्डअप करून या मधील एका मजल्यावर बॅडमिंटन कोर्ट करण्यात यावे तसेच याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाना, IT कंपन्यांना भाडे तत्त्वावर, महापालिकेचे विभागीय कार्यालय, MPSC, UPSC विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, कोचिंग क्लासेस व यातील काही मजले विकासकला द्यावे लागतील व उर्वरित जास्तीत जास्त मजल्यांवर महापालिकेची मालकी राहील व महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सदर जागेवर अन्य सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. अन्यथा कोल्हापूर महानगरपालिकेच्या कित्येक जागा अनेकांच्या घशात कवडीमोल भावाने गेल्या आहेत त्या पद्धतीने हि जागा देखील जाण्याची शक्यता आहे.
यावर मा. आयुक्त बोलताना म्हणाले, सदर जागे संदर्भात योग्य ती माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. या प्रस्तावाला मनपाचे उत्पन वाढण्याच्या दृष्टीकोनातून सकारात्मक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर त्या ठिकाणी होत असलेले मोठ्या गाड्यांचे अतिक्रमण तत्काळ काढण्यास व जागा स्वच्छ करून घेण्यासाठी मा. आयुक्त यांनी सूचना केल्या.




