प्रगणकाचा आकस्मित मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्या : खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी
कोल्हापूर दि. २६ : जनगणना कर्तव्यावर असलेल्या प्रगणक, सुपरवायझर आकस्मित मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्या अशी मागणी राज्याच्या जनगणना कार्य संचनालयाच्या संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने करण्यात आली.मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले.
संपूर्ण देशभर १५ मे ते १४ जून या कालावधीत जनगणनेचे काम सुरू असून जनगणना प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक यांची प्रगणक व सुपरवायझर पदी नेमणूक करण्यात आली आहे. जनगणना हे निवडणूक व आपत्ती व्यवस्थापनाप्रमाणे राष्ट्रीय कर्तव्य असून या राष्ट्रीय कर्तव्यावर शिक्षक मुख्याध्यापक प्रामाणिकपणे काम करत आहेत. तथापी सदरची जनगणना ही संपूर्णपणे उष्ण कालावधीमध्ये होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान 40°c पेक्षा जास्त आहे.
सदरचे कर्तव्य पार पडत असताना उष्मघातामुळे, डी हायड्रेशन, हृदयविकार किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावू शकतो. किंवा कर्तव्यावर असताना प्रवासादरम्यान अपघात होऊन मृत्यू होऊ शकतो. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पालकरवाडी येथील प्राथमिक शिक्षक भगवान विलास पाटील तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राजाराम दामोदर ढोले यांचा हृदयविकाराने तर लातूर जिल्ह्यातील सुंदरम वांगुसकर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
जनगणना कर्तव्यावर असणाऱ्या प्रगणक व सुपरवायझर यांचा नैसर्गिक किंवा अपघाती आकस्मित मृत्यू झाल्यास सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयास किमान दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तात्काळ मंजूर करण्यात यावे. तसेच कुटुंबातील व्यक्तीस अनुकंपा तत्वाखाली शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील, शहराध्यक्ष संतोष पाटील, करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे,शहर कार्याध्यक्ष धीरज पारधी,शहर सहसचिव रवींद्र नाईक, धनंजय शिंदे, संदिप डवंग,श्रीकांत पाटील, शहर शिक्षकेतर प्रमुख अर्जुन चाफोडीकर,पुरुषोत्तम मेक्कळके इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.





