उद्योग, रोजगार व जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी सैनिक टाकळी येथे एमआयडीसीची कार्यवाही ताबडतोब सुरु करावी

Spread the news

उद्योग, रोजगार व जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी सैनिक टाकळी येथे एमआयडीसीची कार्यवाही ताबडतोब सुरु करावी
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांचेकडे निवेदनाव्दारे मागणी
कोल्हापूर दि. १२: शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शासकीय जमीनीवर एमआयडीसी होणेसाठी  शासन अध्यादेश असून त्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडे हस्तांतरित केलेल्या जागेत एमआयडीसी सुरु होणेची कार्यवाही ताबडतोब सुरु करावी अशी मागणी निवेदनाव्दारे निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांचेकडे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने केली. निवेदनात म्हंटले आहे, सैनिक टाकळी येथे एमआयडीसी साठी जागा प्रस्तावीत असून त्याबाबत शासन अध्यादेश देखील निघालेला आहे. तेथे एमआयडीसी साकारल्यास मोठे उद्योग येऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासास हातभार लागेल व स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे.
कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी यावेळी सांगितले की, उद्योगस्नेही राज्यासाठी राज्य शासन नवनवीन प्रोत्साहन योजना आणून उद्यमशील महाराष्ट्र घडणेसाठी प्रयत्न करत असते. तसेच महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून ‘गाव तेथे उद्योजक’ ही संकल्पना राबविली जात असून महाराष्ट्र शासनासोबत या संकल्पनेबाबत सामंजस्य करार देखील झाला आहे. ‘गाव तेथे उद्योजक’ या संकल्पनेमुळे अगदी छोट्या छोट्या गावात देखील उद्योजक घडणार आहेत. एखाद्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आल्यास तेथील स्थानिकांना उद्योगवाढीसह रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. शिरोळ तालुक्यातील गांवागांवात देखील उद्योजक घडावेत अशी आमची भुमिका आहे. त्यादृष्टीने शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील जमीनीवर उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण आहे तसेच आवश्यक जमीन देखील उपलब्ध आहे. एमआयडीसी होणेसाठी येथील जमीन प्रस्तावित असून तेथे एमआयडीसी होणेची कार्यवाही ताबडतोब सुरु करावी. प्रस्तावित जागेत एमआयडीसी साकारल्यास सदर जागेत मोठे उद्योग येण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे प्रयत्न केले जातील. पर्यायाने स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची उपलब्धता होईल व शिरोळ तालुक्याच्या तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या महसुलात वाढ होऊन आर्थिक विकासास देखील मोठा हातभार लागणार आहे.
यावेळी कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, माजी उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, माजी खजानिस राहुल नष्टे, संचालक अनिल धडाम उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!