कणेरीवाडीत संतापाचा स्फोट: जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवर अधिकाऱ्यांना बैठकीतून हाकलले; ७ तारखेला धडक मोर्चा

Spread the news

कणेरीवाडीत संतापाचा स्फोट: जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवर अधिकाऱ्यांना बैठकीतून हाकलले; ७ तारखेला धडक मोर्चा

­

 

वार्ताहर – कणेरीवाडी येथे आयोजित आढावा बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुधार गांधीनगर प्रादेशिक १३ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतील प्रचंड विलंब, निकृष्ट कामे आणि प्रशासनाच्या उदासीनते विरोधात तेरा गावांतील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा संताप उसळला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि मेघा इंजिनिअरिंग (हैदराबाद) कंपनीच्या प्रतिनिधींना बैठकीतून अक्षरशः हाकलून लावण्यात आले.
बैठकीपूर्वी आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. अनेक ठिकाणी कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे तसेच अपूर्ण व विस्कळीत कामामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी कामाच्या दर्जावर व गतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  •  

२७ महिन्यांच्या मुदतीची ही योजना चार वर्षांहून अधिक काळ उलटूनही केवळ सुमारे ५० टक्केच पूर्ण झाली आहे. काही भागात तर ३० टक्क्यांवरच काम अडकले आहे. उकरलेले रस्ते तसेच सोडल्याने, वारंवार होणाऱ्या पाईपलाईन गळतीमुळे आणि सलग १०-११ दिवस पाणीपुरवठा ठप्प राहिल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून तीव्र असंतोष पसरला आहे.
गेल्या वर्षी सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची कोणतीही पूर्तता न झाल्याने या बैठकीत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

आमदार सतेज पाटील यांचा इशारा
कामांच्या पाहणीनंतर आमदार सतेज पाटील यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत, “वर्षभरापूर्वी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही. अनेक ठिकाणी कामे अपुरी व निकृष्ट दर्जाची आहेत,” असे स्पष्ट केले. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेला त्यांनी ठाम पाठिंबा देत प्रशासनाला कामे तातडीने पूर्ण करण्याचा इशारा दिला.

माजी आमदार ऋतुराज पाटील यांची भूमिका
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सुरुवातीला संयमी भूमिका घेत अधिकाऱ्यांकडून लेखी हमी घेण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, वारंवार दिलेली आश्वासने फोल ठरल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेकेदारावर अविश्वास व्यक्त केला. काहींनी या योजनेचे श्रेय ऋतुराज पाटील यांना मिळू नये म्हणूनच कामात अडथळे आणले जात असल्याची शंका व्यक्त केली.

ग्रामपंचायतींचा संताप अनावर
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत “सतत पाठपुरावा करूनही कामे पूर्ण होत नाहीत, अधिकारी मुद्दाम चालढकल करत आहेत,” असा आरोप केला. परिस्थिती चिघळल्यानंतर अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आले.
कार्यकारी अभियंता डी. के. पाटील, उपअभियंता प्रभाकर गायकवाड तसेच मेघा इंजिनिअरिंगचे व्यवस्थापक नितीन माने व शरदचंद्र यांनी अखेर काढता पाय घेतला.
प्रशासनाची कारणे फेटाळली
अधिकाऱ्यांनी निधीअभावी अडथळे, महामार्गाची कामे व बदलते आराखडे ही कारणे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही कारणे लोकप्रतिनिधींना मान्य न झाल्याने त्यांना अधिक बोलण्यासही मज्जाव करण्यात आला.

७ तारखेला धडक मोर्चा
या घटनेनंतर झालेल्या बैठकीत महिलांसह तेरा गावांतील ग्रामस्थांचा ७ तारखेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपस्थित मान्यवर
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, पंचायत समिती सदस्य शिल्पा हजारे, संदीप पाटील, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, पाचगावच्या सरपंच प्रियांका संग्राम पाटील, उपसरपंच रोमा नलवडे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, उंचगावचे उपसरपंच संदीप पाटील, मोरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश हुन्नुरे, गडमुडशिंगीचे सुदर्शन पाटील, संजय पाटील, अरुण शिरगावे, साताप्पा कांबळे यांच्यासह तेरा गावांतील मोठ्या संख्येने पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कामे तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!