राज्यातील अनेक साखर कारख्यान्यांनी एक रक्कमी एफ. आर. पी. अदा केले असल्याची बोगस माहिती साखर आयुक्तांना पाठविली गेली आहे. राज्यात अजूनही जवळपास ३५०० कोटी रूपयाची एफ. आर. पी थकीत असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त डॅा. संजय कोलते यांना निदर्शनास आणून दिली.
राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफ. आर. पी. बाबत तातडीने आर .आर .सी ची कारवाई सुरू करावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी आज पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात आयुक्त डॅा.संजय कोलते यांची भेट घेतली. राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास अडीच महिने झाले तरीही राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दिली नाही. वास्तविक पाहता साखर आयुक्त यांनी साखर सहसंचालक व लेखापरिक्षक यांच्यामार्फत थकीत एफ. आर. पी. बाबत कारखानानिहाय तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
चालू वर्षी बाजारांमध्ये साखरेसह उपपदार्थांना चांगले भाव मिळाले आहेत. मात्र साखर कारखानदारांनी केंद्र सरकारकडून अनुदान किंवा पॅकेज मिळविण्यासाठी शेवटच्या दिड महिन्यात गाळप झालेल्या ऊसाची एफ. आर. पी. अदा केलेली नाही. याचा फटका राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकार साखर कारखानदार धार्जिणे झाले असल्याने कारवाईचा फार्स केला जात आहे.
यावेळी साखर आयुक्त कोलते यांनी येत्या आठवड्याभरात राज्यातील साखर कारखान्याची थकीत एफ. आर. पी. बाबतची वास्तव माहिती घेऊन अशा पध्दतीने कारखान्यांनी फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी ग्वाही दिली.यावेळी साखर आयुक्त कार्यालयातील अर्थ व उत्पादन विभागाचे सहसंचालक तसेच स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.




