कोल्हापूर, प्रतिनिधी :
देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना राजकीय स्वातंत्र्यासोबतच समाजाला विविध व्यसनांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा संदेश देणारे एक आगळेवेगळे जनजागृती अभियान महावीर महाविद्यालयाच्या बी. एम. रोटे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कोल्हापुरात राबविण्यात आले. “नशेच्या गुलामगिरीतून मुक्ती हाच खरा स्वातंत्र्याचा मार्ग” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख ठिकाणे असलेल्या दाभोलकर कॉर्नर आणि सी.बी.एस. स्टँड परिसरात फलक, घोषवाक्ये आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती केली.
सध्याच्या काळात युवकांमध्ये वाढत असलेले तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट, मद्यपान आणि इतर व्यसनांचे प्रमाण ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. अनेक कुटुंबांचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान करणाऱ्या या व्यसनांविरोधात समाजात जागरूकता निर्माण व्हावी, युवकांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करावा आणि स्वातंत्र्यदिनाचा खरा अर्थ समजून घ्यावा या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. अभियानादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हातात आकर्षक आणि आशयघन फलक घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘ चला कोल्हापूर नशामुक्त करूया’ ‘एकच ध्यास नशामुक्त कोल्हापूर खास’ , “व्यसनाला नाही म्हणूया, निरोगी भारत घडवूया”, “नशामुक्त युवक – राष्ट्राची खरी शक्ती”, “स्वातंत्र्य हवे असेल तर व्यसनातून मुक्त व्हा”, “नशा सोडा, आयुष्य जोडा”, “स्वतः वाचा, कुटुंब वाचवा” अशा संदेशांनी सजलेले फलक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरले.
दाभोलकर कॉर्नर आणि सी.बी.एस. परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक, प्रवासी, विद्यार्थी आणि युवकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वयंसेवकांनी नागरिकांशी संवाद साधत व्यसनांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, कुटुंबव्यवस्थेवर होणारे परिणाम आणि सामाजिक जीवनातील त्याचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. अनेक नागरिकांनीही या अभियानाचे कौतुक करत नशामुक्त समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. श्वेता परुळेकर, प्रा. रामदास तुरुके, प्रा. नेहा पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी अग्रेसर भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, अभियानाचे नियोजन करणे आणि जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले तर या उपक्रमात अनुराधा देसाई, साक्षी पाटील यांच्यासह बी. एम. रोटे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांशी संवाद साधत व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविला.
या अभियानाची विशेष आकर्षण ठरली ती अवघ्या सात वर्षांची बालचमू नेत्रा तुरुके. लहान वयातही सामाजिक प्रश्नांविषयी असलेली जागरूकता आणि नशामुक्तीच्या संदेशाबद्दलची तिची तळमळ सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. हातात जनजागृतीचा फलक घेऊन नागरिकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देताना तिचा उत्साह आणि सहभाग उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. समाजपरिवर्तनाच्या कार्यात वय महत्त्वाचे नसून संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते, याची प्रचिती तिच्या सहभागातून आली.
या उपक्रमासाठी महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी, पर्यवेक्षक जावेद मेस्त्री त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव जोपासण्याची आणि प्रत्यक्ष समाजकार्य करण्याची संधी मिळाली. उपक्रमास प्रा. सचिन बराटे आणि प्रा. विष्णू चव्हाण यांचे या सहकार्य लाभले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या अभियानातून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला की, राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होऊन अनेक दशके लोटली असली तरी व्यसनांच्या विळख्यात अडकलेला समाज खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकत नाही. निरोगी, सक्षम आणि सशक्त भारत घडविण्यासाठी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याला एक सामाजिक परिमाण दिले असून, “नशेच्या गुलामगिरीतून मुक्ती हाच खरा स्वातंत्र्याचा उत्सव” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात यश मिळविले.



