*बाल वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग*
*कागलमध्ये चिमुकल्यांसमवेत मोठ्या उत्साहात रमले दिंडीत*
*विठ्ठल -रखुमाईचे घेतले मनोभावे दर्शन*
कागल, दि. २५:
आषाढी एकादशीनिमित्त कागल शहरात श्री. दत्त विद्यामंदिरच्या चिमुकल्यांनी काढलेल्या दिंडीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफही मोठ्या उत्साहात सहभागी झाले. “विठोबा रखुमाई” या जयघोषात या बाल वारकऱ्यांसमवेत मंत्री श्री . मुश्रीफही चांगलेच रममान झाले. वारकऱ्यांच्या वेशात तीनशेहून अधिक बाल वारकऱ्यांनी काढलेल्या या दिंडीमुळे शहरातील वातावरण भक्तीमय झाली. ही दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
कागलमधील मुख्य बाजारपेठेतून टाळ मृदंगाच्या गजरात निघालेली ही दिंडी श्री. विठ्ठल रखुमाई मंदिरापासून प्रभू श्री. राम मंदिरापर्यंत निघाली. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पालखीला खांदा देत श्री. विठ्ठल- रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत, राज्यात शांतता, समाधान आणि समृद्धी नांदू दे आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रवीण काळबर, माजी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, नगरसेवक अमित पिष्टे, वारकरी सांप्रदायाचे संत माळी, शामराव पाटील, बंडा साठे, अजित निंबाळकर, युवराज पाटील, उत्तम कांबळे यांच्यासह वारकरी व नागरिक माता – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……….
*कागल: आषाढी एकादशीनिमित्त कागल शहरातील श्री दत्त विद्या मंदिराच्या चिमुकल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी काढलेल्या दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ मोठ्या उत्साहात सहभागी झाले.*
==========




