मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर परंपरागत पद्धतीने बकरईद उत्साहात साजरी…
कोल्हापूर, दि. 28 :
मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरईद (ईद-उल-अजहा) सण गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर परंपरागत पद्धतीने ईदची नमाज अदा करण्यात आली.
पहिल्या जमातीसाठी मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी नमाज पठण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या जमातीची नमाज हाफीज मोहम्मदजैद मुल्ला यांनी अदा केली, तर तिसऱ्या जमातीसाठी मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले.
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कणेरकर, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक अमर समर्थ, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, नासिर धारवाडकर, ताज मुल्याणी, समीर कामी, दिलावर पठाण यांच्यासह विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत संस्थेचे प्रशासक कादरभाई मलवारी यांनी केले, तर मान्यवरांचे आभार संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी मानले. यावेळी सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन कोल्हापूर शहर आणि देशात एकात्मता, बंधुभाव व सुखशांती कायम राहावी, अशी प्रार्थना केली.
या प्रसंगी मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदील फरास, संचालक हाजी पापाभाई बागवान, हाजी लियाकत मुजावर, हाजी जहांगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी आणि मलिक बागवान यांच्या हस्ते उपस्थितांना शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले.





