शेंडूर अंगणवाडीची दुरावस्था; लाईट आणि शौचालयाची सुविधाही नाही
शेंडूर : प्रतिनिधी
शेंडूर गावातील अंगणवाडीतील सोयी-सुविधांची दुरावस्था झाली असून, लहान मुलांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीच्या फंडातून अंगणवाडीतील मुलांसाठी चप्पल स्टँड खरेदी करण्यासाठी २४ हजार १०० रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अंगणवाडीमध्ये चप्पल स्टँडच उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तसेच फॅन खरेदीसाठीही २४ हजार १०० रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. अंगणवाडीत दोन फॅन असून, दोन्ही फॅन बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे उकाड्याच्या दिवसांत चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
अंगणवाडीत लाईटसाठी फिटिंगचे काम करण्यात आले असले तरी लाईटची सुविधा उपलब्ध नाही. याशिवाय अंगणवाडीत शौचालयाची सुविधाही नसल्याने मुलांची मोठी गैरसोय होत आहे.
अंगणवाडीतील विविध कामे व निधीचा वापर मनमानी पद्धतीने केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
चिमुकल्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सुविधांचा विचार करून अंगणवाडीत लाईट, शौचालय, चप्पल स्टँड तसेच सुरू असलेले फॅन यांसह आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कागल प्रतिनिधी : अजित बोडके



