प्रा. डॉ.चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, कथाकार आणि चरित्रलेखक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी प्रा. डॉ. नलगे यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेचा गौरव करत, भारत सरकारने त्यांना प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. लवटे म्हणाले की, प्रा. नलगे यांनी कादंबरी, कथा, चरित्रलेखन तसेच इतर साहित्यप्रकारांतून मराठी साहित्यविश्वाला बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या साहित्यकृतींनी अनेक पिढ्यांना वैचारिक दिशा दिली असून, मराठी भाषेच्या समृद्धीतही महत्त्वाची भर घातली आहे. त्यांच्या या दीर्घ आणि उल्लेखनीय साहित्यसेवेचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भेटीदरम्यान साहित्य, शिक्षण आणि समकालीन सामाजिक घडामोडींवर मनमोकळा संवाद झाला. उपस्थितांनी प्रा. नलगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. नलगे यांनी सर्वांनी व्यक्त केलेल्या प्रेम, सदिच्छा आणि आपुलकीबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार, प्रा. सी. एम. गायकवाड, प्रा. टी. के. सरगर, प्रा. जॉर्ज क्रुझ, भिवाजी काटकर, प्रकाश ठाणेकर, तुषार चोपडे, संजय कळके, मारुती फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.




