प्रा. विनय गजानन पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा 17 एप्रिल रोजी होणार
गौरव ग्रंथ प्रकाशन
:
कोल्हापूर
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या शतकमहोत्सवी शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरच्या किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमुख प्रा. विनय गजानन पाटील हे ३६ वर्षाच्या सेवेनंतर दि. ३१ मे, २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी केलेल्या शैक्षणिक, शेती, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करून त्यांचा यथोचित सपत्नीक सत्कार करण्याचा निर्णय प्रा.विनय गजानन पाटील गौरव समिती, कोल्हापूर व विविध संस्थांनी घेतलेला आहे.
त्यानुसार शुक्रवार दि. १७ एप्रिल, २०२६ रोजी सायं. ०४.३० वाजता अमृतसिध्दी सांस्कृतिक भवन, कळंबा रोड, कोल्हापूर येथे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे अध्यक्षतेखाली आणि पुणे शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, सहसंचालक (सेवानिवृत्त) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, पुणेचे चंद्रकांत निनाळे व ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होणार असून या समारंभास हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह, वाळवाचे प्रमुख वैभव नायकवडी, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष श्री.बी.जी. बोराडे व चेअरमन डॉ. के.जी. पाटील यांची विशेष उपस्थिती असेल. या समारंभात ‘विनय’ या गौरव ग्रंथाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन केले जाईल.
प्रा. विनय गजानन पाटील यांचे जन्मगांव सांगली जिल्हयातील गोटखिंडी असून इ. ८ वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण करून इ. ९ वी च्या वर्गात महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे प्रवेश घेतला व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या मुलांच्या वसतिगृहात राहू लागले. न्यू कॉलेजमधून इ. १२ वी चे शिक्षण घेतल्यानंतर संस्थेच्याच न्यू पॉलिटेक्निकमधून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ही पदवी घेतली. १९९० पासून ते महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे ऑटो इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून रूजू झाले व नंतर ते एम.सी.व्ही.सी. विभागाचे विभागप्रमुख म्हणून आजअखेर यशस्वीपणे कार्यरत आहेत.
आदर्श शिक्षक : शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून त्यांनी केवळ नोकरी न करता शिक्षण हेच व्रत मानले. परिणामी ते विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक बनले. केवळ ऑटोमोबाईल विभागच नव्हे तर संपूर्ण किमान कौशल्य विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी अत्यंत कुशलतेने काम पाहिले. त्यांच्या या उत्तुंग कार्याची पोचपावती म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांचा ‘गुणवंत शिक्षक’ हा पुरस्कार दोन वेळा देऊन गौरविले आहे. प्रा. विनय पाटील सरांच्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी टू व्हीलर मेकॅनिक व्यवसायात उतरविण्यासाठी स्वतःहून आर्थिक पाठबळ दिले.
आदर्श शेतकरी व शिक्षणप्रेमी प्रा. विनय पाटील यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही शिक्षण व शेती या दोन समृध्द परंपरांच्या मुशीत झाली आहे. त्यांचे वडील गजानन बळवंत पाटील हे गोटखिंडीतील एक कष्टाळू आणि ‘कृक्षिभूषण’ म्हणून सर्वपरिचित शेतकरी तर दुसरीकडे त्यांचे चुलते मुख्याध्यापक दादासाहेब ऊर्फ डी.बी. पाटील हे नामांकित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन आणि शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व ! शेतीतील प्रयोगशीलता आणि शिक्षणातील ध्येयासक्ती असा
दुहेरी वारसा विनय पाटील सरांना लाभला. त्यांनी स्वतःच्या शेतीबरोबरच संस्थेचे शेती विभाग प्रमुख म्हणून संस्थेच्या हणबरवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथील वीस एकर जमिनीचे नंदनवनात रूपांतर केले. भात, ऊस, भाजीपाला, कलिंगडे, बटाटे यांचे उत्पन्न संस्थेला मिळते. आंबा, चिक्कू, नारळ इ. फळझाडांपासून दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळते. हणबरवाडी येथील संस्थेची शेती कृषी पर्यटन स्थळ बनले आहे.
गोटखिंडी येथील त्यांच्या शेतीत ज्यांनी ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. कृषिभूषण असलेल्या आपल्या पित्याचे म्हणजे स्व. बापूंचे अतिशय सुंदर स्मारक त्यांनी शेतात उभे केले आहे.
धडाडीचे कार्यकारिणी सदस्य प्रा. विनय पाटील सरांची संस्थेवरील अपार निष्ठा, विद्यार्थी विकासाचे अध्यापन कौशल्य, सामाजिक कार्याची आवड आदी बाबींचा विचार करून संस्थेने त्यांची ‘कार्यकारिणी सदस्य’ म्हणून नियुक्ती केली. संस्थेच्या शेती विभागाचे त्यांचे कार्य आदर्शवत आहे. याशिवाय संस्थेचे बांधकाम समिती प्रमुख, स्पर्धा परीक्षा समिती प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदा-या देण्यात आल्या व आजअखेर हया सर्व जबाबदा-या ते निष्ठेने पार पाडत आहेत. सन २०१६ मध्ये त्यांना “कविवर्य सूर्यकांत खांडेकर शिक्षक सेवा गौरव पुरस्कार” देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
विविध संस्थांचे आधारवड प्रा. विनय पाटील सर हे सध्या शिक्षण प्रसारक मंडळ, गोटखिंडीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. माजी आमदार भगवानराव पाटील शिक्षण संस्था, सागाव ता. शिराळा जि. सांगली या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील सामाजिक व शैक्षणिक ट्रस्टचे संचालक असून कोल्हापूर हौशी हॅण्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवाचे सदस्य म्हणून अतिशय उत्तम कार्य त्यांनी केले. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या विविध उपक्रमांत व आआंदोलनात सक्रिय असतात.
उत्तम वक्ते : प्रा.विनय पाटील सर यांचे विविध विषयांवरील ग्रंथाचे, साहित्याचे वाचन चालू असते ते व्यासंगी वाचकच नव्हे तर उत्तम वक्ते आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध विषयांवर २०० च्या वर व्याख्याने विना मानधन दिली आहेत. विविध वृतपत्रांतून त्यांनी लेखन केले असून आकाशवाणी व दूरदर्शनवरून शैक्षणिक विचार प्रसारण झाले आहे. आजवर दीड हजारांवर विविध वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे.
त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना सकाळ माध्यम समूहाचा “आयडॉल्स महाराष्ट्र गुरूवंदना” पुरस्कार देऊन गौरविले आहे.
अशा ह्या विनय पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा होणार आहे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे
यानिमित्त झालेल्या पत्रकार बैठकीस समितीचे अध्यक्ष प्राचार्य बी. एम. हिर्डेकर कार्याध्यक्ष सी.एम. गायकवाड प्राचार्य जी.पी. माळी, प्राचार्य प्रवीण चौगुले, युवराज कदम, कलगोंडा प्रा. मनीषा नाईकवडी आझाद नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते




