श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांची पाहणी करताना काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या.

Spread the news

श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांची पाहणी करताना काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या.
हे काम ज्या राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे, त्या विभागाकडून कामावर नियमित देखरेख करण्यासाठी कोणताही तज्ज्ञ अधिकारी प्रत्यक्ष स्थळी उपलब्ध करून दिलेला दिसून आलेला नाही.
मंदिर ज्यांच्या नियंत्रणाखाली आहे त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडेही मंदिराच्या जतन व संवर्धन कामासंदर्भातील नकाशे, कामाची पद्धत, तांत्रिक माहिती अथवा संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
ज्या खाजगी कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले आहे, त्या कंपनीनेही संवर्धन विषयातील आवश्यक तज्ज्ञांची नियुक्ती केलेली नाही.
मंदिरातील श्री मातृलिंगावरील मुख्य शिखरास गळती लागलेली असून सध्या पाऊस थांबल्यामुळे तिची तीव्रता वाढलेली नाही. मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वी या शिखराच्या संवर्धनाचे काम पूर्ण करणे अथवा पावसाचे पाणी शिखरामध्ये मुरणार नाही यासाठी आवश्यक ती संरक्षणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना परिसरातील शिलालेखांच्या संरक्षणाची योग्य ती काळजी घेतलेली दिसून येत नाही. या शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यांचे संरक्षण प्राधान्याने केले जाणे आवश्यक आहे.
मंदिरासमोरील गरुड मंडपातील तब्बल आठ खांबांना तडे गेले असून हे खांब पुन्हा बदलण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे यासाठी अतिरिक्त वेळ आणि निधी खर्च होण्याची शक्यता आहे.
मंदिरासमोरील महाद्वारावर एअर-अब्रेशन (Air Abrasion) पद्धतीने स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे. तथापि, पाऊस व वातावरणीय परिणामांमुळे महाद्वारावरील काही भाग पुन्हा खराब होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या पद्धतीने करण्यात आलेल्या कामाच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराबाबत असलेल्या तीव्र लोकभावना लक्षात घेता शासनाने केवळ राज्य पुरातत्त्व विभागातील एका अधिकाऱ्यावर अवलंबून न राहता कोल्हापूर तसेच राज्यातील इतर भागांतील वास्तू संवर्धन, पुरातत्त्व, स्थापत्य, शिल्पकला आणि इतिहास क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली विस्तृत सल्लागार समिती स्थापन करून या महत्त्वपूर्ण कामावर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
या जतन व संवर्धन कामांवर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधी खर्च होणार असल्याने या खर्चाचे वेळोवेळी स्वतंत्र आणि तांत्रिक मूल्यमापन केले जाणेही तितकेच आवश्यक आहे.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!