शिराळ्यात जनसुराज्य पक्षाची दमदार एंट्री; राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

Spread the news

शिराळ्यात जनसुराज्य पक्षाची दमदार एंट्री; राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

­

 

सांगली/ (प्रतिनिधी) : शिराळा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाशी संबंधित अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा नेतृत्वाने जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक व आमदार डॉ. विनय कोरे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम तसेच जिल्हा परिषद सदस्य साईतेजस्वी सत्यजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वारणानगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

  •  

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी बाजार समिती संचालक प्रताप यादव, शिराळा नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक अभिजीत यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) शिराळा शहर कार्याध्यक्ष तुषार यादव, युवा उद्योजक स्वानंद महाजन, तसेच विशाल लोहार, संदीप यादव, ऋषिकेश यादव, ओंकार यादव, आदित्य परदेशी, अक्षय सुतार, ऋतिक गायकवाड, शहाजी पाटील, मनोहर खिलारे आणि राजेश चौगुले यांनी जनसुराज्य पक्षाचा झेंडा हाती घेत पक्षात अधिकृत प्रवेश केला.

प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करत आमदार डॉ. विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्ष हा विकासाभिमुख, लोककेंद्रित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढणारा पक्ष असल्याचे सांगितले. शिराळा तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचवून जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यात जनसुराज्य पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आपल्या भाषणात, जनसुराज्य पक्षाच्या सर्वसमावेशक आणि विकासप्रधान भूमिकेवर विश्वास ठेवून अनेक युवा कार्यकर्ते व स्थानिक नेतृत्व पक्षात दाखल होत असल्याचे सांगितले. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य संधी, सन्मान आणि जबाबदारी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिराळा तालुक्यात संघटन विस्तारासाठी युवा शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाला निश्चितच नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद सदस्य साईतेजस्वी सत्यजित देशमुख यांनीही नवप्रवेशितांचे अभिनंदन करत, शिराळा तालुक्याच्या विकासासाठी जनसुराज्य पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. विकास, पारदर्शकता आणि लोकहिताची भूमिका स्वीकारणाऱ्या जनसुराज्य पक्षाकडे युवकांचा वाढता ओढा हा सकारात्मक बदलाचा संकेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पक्षप्रवेश सोहळ्याला जनसुराज्य पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिराळा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिराळा तालुक्यात जनसुराज्य पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, आगामी राजकीय समीकरणांवर या पक्षप्रवेशाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!