शिक्षकांनी  विद्यार्थ्यांमध्ये  संशोधनवृत्ती  व  सुसंस्कार  रुजवावेत ”             –   प्रा. मिलिंद जोशी,

Spread the news

  शिक्षकांनी  विद्यार्थ्यांमध्ये  संशोधनवृत्ती  व  सुसंस्कार  रुजवावेत 

­

 

  •  

            –   प्रा. मिलिंद जोशी,  प्रसिध्द लेखक आणि वक्ते

कोल्हापूर दि. 9 :  आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे योगदान खूप मोठे आहे. बापूजींचा वारसा प्रत्येक शिक्षकांनी जोपासणे गरजेचे आहे.  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला समृध्द व संपन्न वारसा आहे. विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल व ज्ञानलालसा, जिज्ञासा वाढली तरच चांगले संशोधक विद्यार्थी तयार होतील. संशोधनाचा प्रवास प्रयोगशाळेतून समाजापर्यंत व्हायला हवा तरच संशोधनाचा उपयोग समाजाला होईल. समाजाची नेमकी गरज काय आहे हे पाहून शिक्षण, अभ्यासक्रम देणे आवश्यक आहे.  शिक्षणात सर्जनशीलता, प्रयोगशीलता, नाविन्यता, कल्प्‍कता अधिक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबीपणा, सकारात्मकता, सुसंस्कार  इत्यादी गुणांची वाढ होण्यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घ्यावेत. शिक्षकांनी नैतिकता, संशोधनवृत्ती, सुसंस्कार आणि समाजाप्रती जबाबदारीची भावना रुजवून विद्यार्थ्यांना सक्षम करावे.  नैराश्यावर मात करण्याची इच्छाशक्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी लागेल.   केवळ पदव्या उपयोगाच्या नाहीत तर आपल्याकडे कौशल्याधारित नाविन्य्ता आणि कल्प्‍कता असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाला आपल्यावर स्वार होऊ न देता संवेदनशीलतेचा संस्कार विद्यार्थ्यांवर करावा लागेल.  आज शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत आहे. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिकीकरणाची नवी आव्हाने उभी आहेत.  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे अनेक संधी उपलब्ध होत असल्या तरी मूल्याधिष्ठ शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा काळात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार याचा समतोल साधणारी़ शिक्षणदृष्टी विशेष मार्गदर्शक ठरते, असे मत प्रसिध्द लेखक व वक्ते प्रा.मिलिंद जोशी यांनी मांडले. ते  श्री स्वामी विवेकानंद  शिक्षण संस्था आयोजित शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 108 व्या जयंती समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण : काल, आज आणि उद्या या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.

प्रमुख पाहुणे मा.खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या मनोगतात, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षणाची गंगा महाराष्ट्रातील गोरगरीबांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे अतुलनीय कार्य करुन राज्यभर संस्थेचा विस्तार केला.  त्यांचे “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार”  हे ब्रीदवाक्य अंगिकारुन शिक्षकांनी विद्यार्थी घडविले पाहिजेत. नाविन्यपूर्णता आणि शैक्षणिक आधुनिकता घडविण्यासाठी सातत्यपूर्ण योगदान विवेकानंद शिक्षण संस्थेने दिले आहे. प्रधानमंत्री कौशल्य्‍ योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.  गुणांना महत्व्‍ देऊ नका, कौशल्य प्राप्त्‍ करुन स्वावलंबी व्हा, ए.आय.तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी करा. उद्याची तरुण पिढी सुसंस्कारित घडविण्याची जबाबदारी ही गुरुदेव कार्यकर्त्यांची आहे.  आगामी विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून श्री कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी संस्थेतील कलाशिक्षक श्री. अमर भागवत यांनी तयार केलेल्या शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे वडील ज्ञानोजीराव साळुंखे यांचे व स्वर्गीय प्राचार्या ज्ञानज्योती सौ. शुभांगी गावडे यांच्या तैलचित्राचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षीय मनोगत मांडत असताना संस्थेचे कार्याध्यक्ष  मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी,  शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी या संस्थेची स्थापना करुन  शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणले.  शिक्षणातील संधी आणि आव्हाने ओळखून बापूजींनी कार्य केले. या शिक्षण यज्ञात बापूजींनी अव्याहतपणे कार्य केले. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने विचारांचे मंथन करण्यासाठी संस्थेतील सर्व गुरुदेव कार्यकर्ते  9 जून व 8 ऑगस्ट या दिवशी संस्थेत एकत्र येतात.  त्यातून शिक्षक नवीन ऊर्जा घेतात व बापूजींच्या तत्वज्ञानाचा अंगिकार करुन विद्यार्थी घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य करतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा होईल यासाठी शिक्षकांनी सदैव तत्पर असले पाहिजे. या जयंती दिनाच्या निमित्ताने शिक्षकांनी बापूजींच्या विचार व कार्याचा वारसा आत्मसात करुन विद्यार्थी घडवावेत.  असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला व खासदार धनंजय महाडिक यांच्या सामाजिक कार्याची ओळख करुन दिली.  ते पुढे म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजींचे जीवन हे संघर्ष, समर्पण आणि शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या असीम निष्ठेचे प्रतिक आहे. श्री स्वामी विवेकानंदांच्या  प्रेरणादायी विचारातून त्यांचे तत्वज्ञान आकाराला आले. अपार कष्ट आणि त्यागातून ही संस्था उभी राहिली आहे. या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपून अनेक विद्यार्थी घडविले आहेत.

प्रारंभी मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. श्री. महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी संस्था प्रार्थना व सुमधूर भक्तीगीते सादर केली.  संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख व विद्या समितीचे अध्यक्ष  डॉ. श्रीराम साळुंखे यांनी प्रमुख वक्ते प्रा.मिलिंद जोशी यांची ओळख करुन दिली.  कार्यक्रमाचे आभार संस्था सहसचिव (प्रशासन) मा. एस. एम. गवळी यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. सुप्रिया पाटील व डॉ.कविता तिवडे यांनी केले.

यावेळी संस्था सहसचिव (अर्थ)  प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ सी. बी. पाटील, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व संस्थेच्या सर्व शाखांतील बहुसंख्य गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.  दुपारच्या सत्रात मुख्याध्यापकांसाठी चर्चासत्र संपन्न झाले.  कार्यक्रमाचे संयोजन संस्थेतील व विवेकानंद कॉलेजमधील गुरुदेव कार्यकर्त्यांनी केले.

————————————————————————————————-

                          

,

 

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!