निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले
संजयबाबा घाटगे व समरजीतसिंह घाटगे यांचे गौरवोद्गार
कागलमध्ये ३४५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप
कागल, दि. २०:
संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार संजयबाबा घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी काढले.
संजय गांधी निराधार योजनेच्या नव्याने मंजूर झालेल्या ३४५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण येथील बहुउद्देशीय कार्यालयात करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना ज्यावेळी सुरू झाली, त्यावेळी या योजनेची खिल्ली उडवण्यात आली. ही योजना कशी काय लोकांपर्यंत पोहोचणार, असे प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र; हसन मुश्रीफ यांच्याकडे हे खाते आल्यानंतर त्यांनी ही योजना प्रत्येकाच्या घराघरात व झोपडपट्टीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी या योजनेचा वापर गोरगरीब लाभार्थ्यांचे कल्याण करण्यासाठीच केला.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, आपण व मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकमेकाविरोधात निवडणुका लढवल्या. मात्र; ही योजना मंत्री श्री. मुश्रीफ यांनीच आणली हे मान्य करावेच लागेल. राज्यात सर्वात जास्त लाभार्थी कागल तालुक्यातील आहेत. या योजनेसाठी उत्पन्नाची अट 21 हजार वरून 50 हजार रुपये करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही तिघेजण प्रयत्न करू.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मी मंत्रिमंडळात काम करत असताना घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये गरीब आणि सामान्य माणसाचे हित कसे होईल हेच पाहिले. विविध योजना गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी व या समितीने केले आहे. या योजनेमुळे राज्यभर माझे नाव “श्रावणबाळ” म्हणून पडले. वयोवृद्ध, अंध, अपंग यांच्यासाठी विविध योजना आपण आणल्या. महायुती सरकारने दिव्यांगांची पंधराशे रुपये पेन्शन आता अडीच हजार रुपये केली आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार रुपये पेन्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ते म्हणाले, या योजनेसाठी उत्पन्नाची अट पन्नास हजार रुपये करणे व वयाची अट ६५ वरून ६० वर्षे करणे यासाठी आम्ही तिघेजण पाठपुरावा करू.
अशा मुलांबद्दल तक्रार करा…..!
श्री. मुश्रीफ म्हणाले, अलीकडच्या काळात आई-वडिलांची सेवा केली पाहिजे हेच मुले विसरून गेली आहेत. लाख- दोन लाख पगार घेणारी मुलेसुद्धा आई-वडिलांना बघत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. आई-वडील काय खातात, पितात हेसुद्धा बघत नाहीत. यासाठीसुद्धा मी एक कायदा केलेला आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनामध्ये जाऊन मुले काळजी घेत नसलेल्या साठ वर्षावरील आई-वडिलांनी जाऊन लेखी तक्रार करायची. अशा मुलांच्या पगारातून दहा हजार रुपये आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग होतात. त्याशिवाय मुलानाही अक्कल येणार नाही. समाजानेही यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.
कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, जनार्दन पाटील, बाबासो सांगले, भूषण पाटील , चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, प्रवीण भोसले, अस्लम मुजावर, नवाज मुश्रीफ, संजय चितारी, अरुण गुरव, नवल बोते यांच्यासह कागलचे नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार सदस्य सौ. पूजा मोरे यांनी मानले.
…………..
कागल- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत नवीन पेन्शन मंजूर झालेल्या ३४५ लाभार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुरीपत्रांचे वाटप झाले.




