सत्य परेशान हो सकता है लेकिन, पराजित नही…….!
राष्ट्रवादी काँग्रेस व घटक मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही
के. डी. सी. सी. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांचे पत्रक
कोल्हापूर, दि. २३:
गोकुळ दूध संघाची होऊ घातलेली निवडणूक, वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू असलेल्या न्यायालयीन आणि प्रशासकीय सुनावण्या या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व घटक मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही, असा निर्वाळा के. डी. सी. सी. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
श्री. माने यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे, आता चालू असलेल्या गोकुळच्या घडामोडीमध्ये रोज सहाय्यक निबंधक- दुग्ध यांची बदली, सहाय्यक निबंधक- दुग्ध यांची बदली रद्द, ११०० अंतरीम अवसायनातील दुध संस्थांची सुनावणी, अंतरीम अवसायानात गेलेल्या दूध संस्थांच्या सुनावणीचा निकाल, उर्वरित अंतरिम अवसायानात गेलेल्या संस्थांच्या पुढील तारखा, उच्च न्यायालयात असलेल्या अनेक तारखा, नवीन कायदा मंजूर झाल्यामुळे प्रशासक येणार का? अशा सगळ्या प्रसार माध्यमातील बातम्या वाचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व घटक मित्रपक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत. त्या अस्वस्थतेतूनच अनेकवेळा आमच्याकडे विचारणा करतात. तुम्हाला विनंती करतो की, कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन, पराजित नही.
दरम्यान आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची कोंडी झाली वगैरे अशासुद्धा बातम्या येत आहेत. ज्यांच्याकडे मतांची शक्ती नाही, अशी काही मंडळी अशा प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. त्याबद्दल तुम्ही विचलित होऊ नका. संताप व्यक्त करू नका. चिंता करू नका. श्री. मुश्रीफसाहेबांच्या ३० ते ३५ वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अशा अनेक संघर्षांना, अनेक वादळांना फार मोठ्या शांततेने, संयमाने आणि विधायक कामाने तोंड देऊन ती परतवूनही लावलेली आहेत. आत्ता तर मा. मुख्यमंत्रीसाहेब त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे कसल्याही संकटांचा सामना ते धीरोदात्तपणाने करतील.
पुढे म्हंटले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते नामदार हसन मुश्रीफसाहेबांनी सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीससाहेबांशी याबाबत अनेकवेळा चर्चा केलेली आहे. आम्हां सर्वांना खात्री आहे की, या चर्चेतून चांगलाच तोडगा निघेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये, मग ती निवडणूक कधीही लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घटक मित्रपक्षांच्या महायुतीचीच सत्ता येईल.




