आमदार शिवाजीराव पाटील यांचे जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवांचे दुःख आम्ही समजू शकतो
प्रताप उर्फ भैया माने यांचे प्रत्युत्तर
कोल्हापूर, दि. १६:
आमदार शिवाजीराव पाटील यांचे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील पराभवाचे दुःख आम्ही समजू शकतो, असे प्रत्युत्तर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी दिले आहे.
श्री. माने यांनी प्रसिद्धीला दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे……,
□ आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार हयात असताना त्यांनी दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र करून घड्याळ चिन्हावर एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम चंदगड, आजरा आणि गडहिंग्लजमध्ये झाला. कारण; तिथे आमदार शिवाजीराव पाटील हे “ही निवडणूक नऊ विरुद्ध झिरो अशी करतो” म्हणत होते. परंतु; तिथे प्रत्यक्षात आठ राष्ट्रवादीचे आणि एकच सदस्य त्यांचा असे बलाबल झाले आणि आजऱ्यामधील दोन जिल्हा परिषद सदस्यही राष्ट्रवादीचेच झाले. तसेच; चंदगडसह आजरा आणि गडहिंग्लज या तिन्हीही पंचायत समित्यांचे सभापतीही राष्ट्रवादीचे झाले. हे त्यांच्या जिव्हारी लागलेलं आहे, हेही आम्हीd समजू शकतो.
□ गेली पाच वर्षे गोकुळ दूध आणि केडीसीसी बँक यावर साधे अवाक्षरसुद्धा आमदार शिवाजीराव पाटील यांनी काढलेले नाही. त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा साक्षात्कार कुठून झाला? हे सबंध जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि केडीसीसी बँकेचे सभासद ओळखून आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी दोन्हीही संस्थेचे काहीही बाहेर काढावे. कारण; गोकुळ दूध संघामध्ये पाच वर्षांपूर्वी सत्तापालट झाल्यानंतर पहिली दोन वर्षे विश्वास आबाजी पाटील, त्यानंतरचे दोन वर्षे अरुणराव डोंगळे आणि अलीकडचे सहा- सात महिने नवीद मुश्रीफ चेअरमनपदी आहेत.
□ गोकुळ दूध संघाच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीपूर्वी आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दुधाला प्रतिलिटर दोन रुपये दूध दरवाढ देतो, असे वचन दिले होते. प्रत्यक्षात प्रतिलिटरला तब्बल १६ रुपये दरवाढ दिली. दूध संघाच्या ठेवी दीडशे कोटी रुपयांवरून तब्बल ७०० कोटी रुपयांवर गेल्या आणि तीनशे कोटीहून अधिक गुंतवणूक झाली. तसेच; फुल क्रीम दूध, गायीचे दूध, श्रीखंड, आंबा श्रीखंड, फुल क्रीम श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, मलई, पनीर, गायी व म्हशीचे तूप, दूध पावडर, पेढा, फ्लेवर्ड मिल्क, टेबल बटर, कुकिंग बटर, गुलाब जामुन आणि चीज गोकुळ आईस्क्रीम या उपपदार्थांचे उत्पादन सुरू केले आणि विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध संघाने २० लाख लिटर संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पार केलेला आहे आणि दैनंदिन दूध विक्रीमध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे.
□ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही तर सबंध महाराष्ट्रात नंबर एकवर आहे. आजघडीला बँकेचा व्यवसाय तब्बल २२ हजार कोटींवर पोहोचलेला आहे. ठेवी साडेबारा हजार कोटींवर गेलेल्या आहेत. गुंतवणूक रू. ५,०३२ कोटी तर बँकेने वितरित केलेली कर्जे रू. ९, ०६२ कोटी आहेत. केंद्र कार्यालयासह बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा सलग नफ्यात आहेत. अशा चांगल्या दोन संस्थांना विनाकारण बदनाम करू नका. त्यापेक्षा पराभवाचे आत्मपरीक्षण करा आणि कुणाच्यातरी हातचे बाहुले होऊ नका.
□ आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत लढून भारतीय जनता पार्टीचा महापौर करण्यासाठीच पुढाकार घेतला. कागल तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीचा पंचायत समिती सभापती केला. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये राहून राष्ट्रवादी एक नंबर आणण्याचे शिवधनुष्य पेलले. आठवड्यापूर्वीच झालेल्या बाजार समिती अध्यक्ष निवडीमध्ये वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भुदरगड तालुक्याचा नंबर होता. श्री. शाहू मार्केट यार्डची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच दलित समाजाचा भाजपचा अध्यक्ष केला. त्यामुळे आम्ही छाती ठोकपणे सांगतो की, भारतीय जनता पक्ष आणि आमचे नेते हसनसाहेब मुश्रीफ ज्या भूमिकेबरोबर राहतात, ती ते प्रामाणिकपणे निभावतात.
□ नामदार हसनसाहेब मुश्रीफ आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मैत्रीच्या संबंधांवर काहीही अफवा पसरण्याची सवयच काही नेत्यांना लागली आहे. वास्तविक; नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची काँग्रेस बरोबरच घनघोर लढाई झाली. राधानगरी, राशिवडे बुद्रुक, कसबा तारळे, कसबा वाळवे तसेच; करवीरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती झाली. चंदगड, गडहिंग्लज, आजरा या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढाई झाली. तिथे तर काँग्रेसचा उमेदवारच नव्हता. विनाकारण आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची या पाठिमगील मैत्री धरून सातत्याने हा मुद्दा करून आपले अपयश लपविण्याची जिल्ह्यातील काही लोकांना सवयच लागलेली आहे. त्यांच्यात तुम्हीही सामील होऊ नका. या सगळ्याचे आत्मपरीक्षण करा आणि कुणाच्याही हातचे बाहूले बनू नका.
□ श्री. माने यांनी म्हटले आहे, नामदार हसनसाहेब मुश्रीफ ज्या ठिकाणी राहतात तिथे ते प्रामाणिकपणानेच काम करतात. आत्तासुद्धा गोकुळमध्ये महायुतीच्या मार्फतच निवडणूक होईल आणि महायुतीचा चेअरमन होईल, असे मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी अनेकदा जाहीररित्या सांगितलेले आहे.




