११०८ दूध उत्पादक संस्थांच्या सुनावणीस अडथळे; प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाशी संबंधित सुमारे ११०८ दूध उत्पादक संस्थांच्या अवसायन प्रक्रियेतील सुनावणीचे कामकाज दिनांक ७ एप्रिलपासून सुरळीतपणे सुरू होते. आज चंदगड व कागल तालुक्यातील संस्थांची सुनावणी नियोजित होती. मात्र, दिनांक १५ व १६ एप्रिल रोजी सुनावणीच्या कामकाजात अचानक खंड पडल्यामुळे संबंधित संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर संस्था प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला.
सदर घडामोडींमुळे या संस्थांना सुनावणीपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना व्यक्त होत असून, त्यामुळे त्यांच्या हक्कांवर तसेच मतदानाच्या अधिकारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या ११०८ दूध उत्पादक संस्था कोल्हापूर जिल्हा दूध संघास दररोज सुमारे २ लाख लिटर दूध पुरवठा करीत असून, संघाने २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे या संस्थांविषयी शंका उपस्थित करताना त्यांच्या कार्याचा व योगदानाचा विचार होणे आवश्यक असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
संस्थांच्या वैधतेबाबत कोणाला शंका असल्यास त्यांनी संबंधित कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून आपली हरकत सुनावणीदरम्यान लेखी स्वरूपात मांडावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, मा. उच्च न्यायालय, सर्किट बेंच, कोल्हापूर यांचे कोणतेही स्पष्ट निर्देश नसताना सुनावणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्थित संस्था प्रतिनिधींनी संबंधित घडामोडींविरोधात निषेध व्यक्त केला. जिल्हा निबंधक आल्यानंतर त्यांनी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. यावेळी प्रतिनिधींनी पूर्ण झालेल्या सुनावण्यांचे निकाल तात्काळ जाहीर करावेत, तसेच उर्वरित संस्थांच्या सुनावण्या विलंब न करता तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली.
तसेच सर्व संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा, अन्यथा दूध उत्पादकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रतिनिधींनी दिला आहे.




