ग्रामिण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ
“कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू
कोल्हापूर/प्रतिनिधी :
सौ. अपर्णा चव्हाण व श्री. आतिश चव्हाण यांनी सुरु केलेल्या व केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी ह्या कोल्हापुरातील स्टार्टअपने अल्पावधीमध्येच देश विदेशात नावलौकिक कमावला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कलापुरीच्या माध्यमातून आज ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. ग्रामीण कारागीरांच्या हस्तकौशाल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी ज्वेलरी व हँडमेड बास्केट ह्या सारख्या उत्पादनांना कलापुरीच्या माध्यमातून आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. ग्रामिण भागातील कारागिरांना विशेषत: महिला कारागिरांना कौशल्याधारीत रोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देणे, ह्या कारागिराना आवश्यक ती सर्व टुल्स व कच्चा माल उपलब्ध करून देणे, कारागिरांनी बनविलेल्या हस्तकलेच्या सर्व वस्तूंना देशात व विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देणे व ह्या माध्यमातून स्वयंपूर्ण खेडी व ग्रामस्वराज्य हे महात्मा गांधींचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे कार्य गेल्या १० वर्षांहून अधिक काळ कलापुरी करीत आहे.
आज कोल्हापूर हे एक फार मोठे टुरिस्ट हब बनले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले टुरिस्ट खात्रीशीर कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक महाराष्ट्रियन ज्वेलरी आणि हँडमेड बास्केट कुठे मिळतील याचा शोध घेत असतात. कलापुरीला आज पर्यंत साथ देणारे कोल्हापूरकर आणि कोल्हापुरात येणारे भाविक यांची गरज लक्षात घेवून कलापुरीमार्फत कोल्हापुरात लक्ष्मीपूरी येथे कलादालन सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती श्रीधर वैद्य आणि सौ अपर्णा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थापक श्री.आतिश चव्हाण आणि अमृता काळे उपस्थित होते.
कलापुरीच्या ह्या कार्याची दखल घेवून नुकताच महाराष्ट्र शासनाने कलापुरीचा हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देवून गौरव केला आहे. मोरेवाडी – ता. पन्हाळा येथे कलापुरीचे कोल्हापुरी चप्पल युनिट, यळगुड – ता. हातकणंगले येथे पारंपारिक दागिन्यांचे यूनिट व सोनी – ता. मिरज येथे हँडमेड बास्केट युनिटच्या माध्यमातून ग्रामिण भागातील ५०० हून अधिक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी कलापुरीने उपलब्ध करून दिली आहे. आज पर्यंत ग्रामिण भागातील महिला कारागिरांनी बनविलेल्या कलाकृतींना ऑन लाईन मार्केटिंगच्या माध्यमातून कलापुरीने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
ह्या कलादालनात जी.आय. मान्यताप्राप्त कारागिरांनी बनविलेल्या आरामदाई व विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ असे नानाविध मनमोहक पारंपरिक दागिने आणि दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त अशा हँडमेड बास्केटस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्रामिण भागातील महिलांनी बनविलेल्या ह्या हस्तनिर्मित वस्तूंना ह्या कलादालनाच्या माध्यमातून करवीरवासियांसमोर प्रदर्शित करायची संधि मिळाली आहे. रविवार दि. २ ऑगस्ट रोजी ह्या
कलादालनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कोल्हापूरचा वारसा असणाऱ्या ह्या हस्तनिर्मित वस्तूंच्या अशा प्रकारच्या पहिल्याच कलादालनास भेट देवून ह्या कलाकृती बनविणाऱ्या महिला कारागिरांच्या कलेस करवीरवासीयांनी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कलापुरीच्या संस्थापिका सौ. अपर्णा चव्हाण यांनी केले आहे. कलापुरी कलादालनाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्य प्रत्येक खरेदीवर भरघोस सूट व एक विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.
कलापुरीशी जोडले गेलेल्या कारागिरांनी बनविलेल्या नावीन्यपूर्ण कलाकृतींना आज पर्यंत ऑन लाईन मार्केटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचे काम कलापुरीने केले आहे. आता कलापुरी कलादालनाच्या माध्यमातून ह्या कारागिरांची कला आम्ही करवीरवासीयांच्या समोर आणत आहोत. कलापुरीच्या ह्या उपक्रमास देखील कोल्हापूरकर आणि कोल्हापुरात येणारे भाविक भरभरून प्रतिसाद देतील असा आम्हांस विश्वास आहे असे
श्री. आतिष चव्हाण, संस्थापक, कलापुरी यांनी यावेळी म्हटले आहे.




