नाले सफाईची सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

Spread the news

नाले सफाईची सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करा : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

­

 

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूरबाधित क्षेत्राची पाहणी

  •  

कोल्हापूर दि.०२: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रमुख आणि लहान नाल्यांची १०० टक्के सफाई होणे आवश्यक आहे. त्यातील गाळ काढून पाण्याचा निचरा विनाअडथळा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. आय.आर.बी.कंपनीने केलेल्या ४९ किमी रस्त्यांच्या शेजारी करण्यात आलेले ड्रेनेज डक्ट तुंबून पाणी रस्त्यावर साठण्याचे प्रकार गेल्या दोन दिवसातील अवकाळी पावसात झाले आहे. त्यामुळे प्राधान्याने संबधित यंत्रणेशी समन्वय ठेवून ड्रेनेज डक्ट साफ करण्यात यावेत. नालेसफाई आणि ड्रेनेज डक्ट सफाईचा सविस्तर कृती आराखडा दोन दिवसात सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील नाल्यांची स्वच्छता आणि पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पूरबाधित क्षेत्राची पाहणी केली. व पुढील २ दिवसांत नाले सफाईचा अ‍ॅक्शन प्लान (कार्य आराखडा) सादर करण्याचे आदेश दिले.

यावेळी सूचना देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शहरातील सर्व प्रमुख आणि लहान नाल्यांच्या सफाईसाठीचा सविस्तर कृती आराखडा २ दिवसांत महापालिका प्रशासनाने सादर करावा. नाले सफाईच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित वॉर्ड अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करण्यात येईल. नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात यावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नाल्यांची शंभर टक्के सफाई पूर्ण करून सखल भागात पाणी साचणार नाही तसेच अवकाळी पावसासह आगामी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही याची दक्षता घेवून कामात पारदर्शकता ठेवा, अशा सूचना दिल्या.

यावेळी महानगरपालिका उप आयुक्त परितोष कंकाळ, उप शहर अभियंता गुजर, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, आश्पाक आजरेकर , प्रशांत नलवडे, आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!