पगार थांबू नयेत यासाठी एरर स्क्रीन अॅप्रुव्हल टॅब सुरु ठेवा :
खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची शिक्षण संचालकांच्याकडे मागणी
कोल्हापूर दि.०३ : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील संचमान्यतेतील त्रूटी दुरुस्ती होऊन पद शिफ्टिंग, पद क्रिएशन व यु-डायस दुरुस्तीचे टॅब दुरुस्त्या पूर्ण होई पर्यंत आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भातील अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षणाधिकारी स्तरावरील एरर स्क्रीन अप्रुव्हल टॅब पूर्वी प्रमाणे सुरु ठेवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले.
खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुणे येथे राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेऊन सदस्य निवेदन सादर केले.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील संचमान्यतेतील त्रुटी तसेच शालार्थ व युडायस प्रणालीत शाळांच्याकडून नजरचुकीने किंवा तांत्रिकदृष्ट्या पायभूत पदे भरताना अनुदानित शाळांची पदे विनाअनुदानित तुकडीवर दिसणे,पूर्णतः अनुदानित शाळांची पदे अंशतः अनुदानित तुकड्यांवर दिसणे, मंजूर पदे भरताना चुकीच्या पदनाम चुकीचे भरणे, तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अन्य शाळेत होत असताना त्या शाळेमध्ये सदर शिक्षकांचे पोस्ट क्रिएट करणे या बाबी दुरुस्त करण्यासंदर्भात सदरचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक,माध्यमिक यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठवला जातो.
परंतू उपसंचालक स्तरावर सदरचे प्रस्ताव वेळेत दाखल होऊनही पद शिफ्टिंग पोस्ट क्रिएशनचे प्रस्ताव वेळेत मंजूर न झाल्यामुळे सदर शाळांचे वेतन अदा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाच जिल्ह्यांच्या प्रस्तावांचा कार्यभार उपसंचालक कार्यालयावर असल्यामुळे सदरचे टॅब उपलब्ध असलेल्या वेळेत हे प्रस्ताव मंजूर होणेसाठी पाच जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक यांना वारंवार उपसंचालक कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.
तरी पद शिफ्टिंग, पद क्रिएशन व यु-डायस दुरुस्तीचे टॅब दुरुस्त्या पूर्ण होईपर्यंत आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भातील अंतिम निर्णय होईपर्यंत शिक्षणाधिकारी स्तरावरील एरर स्क्रीन अप्रुव्हल टॅब पूर्वी प्रमाणे सुरु ठेवण्यात यावा. त्यामुळे सदर शाळातील वेतनाचा प्रश्न निर्माण होणार नाही. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे, जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सचिन वसावे इत्यादी उपस्थित होते.





