सावर्डे बुद्रुकमध्ये वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न
सावर्डे बुद्रुक : मौजे सावर्डे बुद्रुक, ता. कागल येथील तरुणांनी एकत्र येत गावाचे ‘हरित स्वप्न’ साकारण्याचा संकल्प केला आहे. यासाठी तरुणांनी ‘पर्णायन’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप सुरू करून त्यामाध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत सन २०२५ मध्ये जवळपास साडेतीनशे वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये कदंब, अशोका, गुळभेंडी, मोहगणी, बदाम, चिंच, आंबा, वड, टर्मिनिलिया आदी विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश होता. केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे वर्षभर संगोपन करायचे, असा संकल्प ‘पर्णायन’च्या माध्यमातून करण्यात आला. त्यानुसार वर्षभर या वृक्षांची काळजी घेण्यात आली असून, प्रत्येक वृक्षाला वृक्षदात्याचे नाव देण्यात आले आहे.
दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी कामिका एकादशीच्या निमित्ताने गावातील रस्त्याच्या दुतर्फा १०० आंबा रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण हा केवळ फोटोसेशनपुरता मर्यादित न राहता, लावलेल्या प्रत्येक वृक्षाची नियमित काळजी घेऊन त्याचे संगोपन करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनोहर लोहार सर यांनी वृक्षांचे महत्त्व, पर्यावरणाचा समतोल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
वृक्षलागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या बंडेराव म्हातुगडे, युवराज घराळ, बबन बोटे, नामदेव तांबेकर, राजेंद्र परीट आणि शामराव म्हातुगडे यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रल्हाद पाटील, तानाजी सावर्डेकर, संजय घराळ, धनाजी घराळ, महादेव पाटील, राजेंद्र कुंभार, संजय म्हातुगडे, रसूल शेख, आर्यन म्हातुगडे, विकास गुजर, सुरेश पाटील, संग्राम बोटे, सुखदेव पाटील, सुनील पाटील, संदीप कांबळे, आप्पासो पाटील, विकास पाटील, शशिकांत म्हातुगडे, भाऊ मोरबाळे, सिद्धार्थ पाटील, अर्जुन किरोळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी समीर सिरसे यांनी उपस्थितांचे व उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
‘झाडे लावूया, झाडे जगवूया आणि सावर्डे बुद्रुकचे हरित स्वप्न साकार करूया’, या संकल्पाने हा वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न झाला.



