अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांची अध्यक्षपदी, तर धनाजी यमकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. १७ सदस्यीय कार्यकारिणीपैकी १६ संचालक समर्थ पॅनेलचे निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे, मेघराज भोसले आणि धनाजी यमकर यांची सलग दुसऱ्यांदा अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांच्या नेतृत्वावर सदस्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आगामी काळातील विविध योजनांची माहिती दिली. २३ जून रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत ज्येष्ठ कलावंतांचे मानधन, कर्मचाऱ्यांचे पेन्शन, सभासद वर्गीकरण आणि पहिले मराठी चित्रपट संमेलन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ज्येष्ठ कलावंतांसाठी वृद्धाश्रम उभारण्याच्या प्रस्तावावरही महामंडळ विचार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी नव्या कार्यकारिणीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून, आगामी काळात कोणते नवे निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण चित्रपट क्षेत्राचे लक्ष लागले आहे.”





