*’राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श पुरस्कार’साठी १० जुलैपर्यंत प्रस्तावांचे आवाहन*
*शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा स्वयंसेविका व महिला बचत गटांचा होणार सन्मान–सौ. नवोदिता घाटगे*
कागल, प्रतिनिधी :
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका तसेच महिला बचत गटांचा ‘सहकारमहर्षी स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श पुरस्कार’ देऊन यंदा सलग सातव्या वर्षी गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपले प्रस्ताव दि. १० जुलै २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर यावा आणि समाजहिताची प्रेरणा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा पुरस्कार उपक्रम गेल्या सात वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे. शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका आणि महिला बचत गटांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला जातो.
सन २०२६ मधील पुरस्कारांची घोषणा सहकारमहर्षि स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीदिनी, दि. २८ जुलै २०२६ रोजी करण्यात येणार आहे. शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पना व प्रेरणेतून सुरू झालेला हा उपक्रम आज प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ओळखला जात आहे.
शिक्षक विभागात प्राथमिक व माध्यमिक अशा स्वतंत्र गटांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, शिक्षकांची निवड गुणांकन पद्धतीनुसार केली जाईल.
पुरस्कारासाठी कागल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संपूर्ण कागल तालुका, गडहिंग्लज शहर, कडगाव जिल्हा परिषद क्षेत्र, आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद क्षेत्र तसेच शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील करवीर तालुक्यातील भागातील पात्र उमेदवारांकडून प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत.
पुरस्कारासाठीचे अर्ज मिळविणे, भरलेले अर्ज जमा करणे तसेच अधिक माहितीसाठी पुढील प्रतिनिधींशी संपर्क साधावा :
कागल–करवीर विभाग :
संदीप मगदूम – ९०९६३३७०१७
तानाजी तारदाळे – ९७६३८७६२७७
दिलीप निकम – ९९७०५६८६२७
गडहिंग्लज–आजरा विभाग :
जनार्दन निऊंगरे – ९६७३१५८६८६
नंदकुमार येसादे – ९७३०६२६२३१
अनिल पाटील – ९९२३६५७६७०




