Spread the news

आयुक्त योग्यच वागले, फक्त महापौरांना सांगून जायला पाहिजे होतं

­

 

को. दि. २२ : काल महानगरपालिकेत सर्वपक्षीय कृती समिती सोबत झालेल्या बैठकीमध्ये , समितीच्या सदस्यांनी ‘आयुक्तांना कोल्हापूरची काळजी नाही ‘ असे म्हटल्यावरून आयुक्त, महापौरांसमक्ष बैठकीतून उठून निघून गेले. त्यांचे हे वागणे योग्यच आहे , मात्र त्यांनी उठून जाताना महापौरांना सांगून गेले पाहिजे होते. महापौरांचा अवमान होईल असे वर्तन योग्य नाही.

  •  

कोल्हापूर महानगरपालिकेला गेल्या अनेक वर्षांनंतर एक चांगले, सक्षम आणि स्वतः होऊन निर्णय करणारे आयुक्त लाभलेले आहेत. गेल्या सहा महिन्यात त्यांनी महानगरपालिका प्रशासन आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या काही नागरिकांना शिस्त लावण्याचा वाखाणण्याजोगा आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरत असलेला प्रयत्न केला आहे. अतिक्रमणाबाबतची त्यांची ठाम आणि कडक भूमिका शहरातील कायदा पाळणाऱ्या सर्वच नागरिकांच्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. गेल्या ५/६ वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीत शहरवासीयांच्या हिताचे अनेक रखडलेले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीनेसुद्धा त्यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्याचवेळी चुकीच्या आणि वेळकाढू कार्यपद्धतीला त्यांनी चांगलाच चाप बसविलेला आहे.

आजवर कोल्हापूरने, काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांच्या स्वार्थासाठी आणि अट्टाहासाठी अनेक चांगल्या गोष्टीमध्ये चुका काढून जनहिताच्या प्रकल्पांचा बट्ट्याबोळ झालेला पाहिला आहे. त्यामुळे चांगल्या मोठ्या कंपन्या कोल्हापूर महानगरपालिकेचे काम करू इच्छित नाहीत ही परिस्थिती निर्माण झालेली कोल्हापूरकर जाणतात. प्रशासनामधील अती राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून चांगले अधिकारीही कोल्हापूरला येऊ इच्छित नाहीत. असे असताना एखादा चांगला अधिकारी आला तर त्याला नैतिक पाठबळ देण्याचे सोडून त्यांचा विनाकारण अपमान होत असेल तर कसे चालेल? कोल्हापुरात आल्यापासून, कोल्हापूरची आणि कोल्हापूर महानगरपालिकेची परिस्थिती सुधारण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांचा केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अवमान करणे हे कोल्हापूरच्या अतिथ्यशील संस्कृतीला शोभत नाही. त्यामुळे आयुक्त योग्यच वागले पण बैठकीतून निघताना त्यांनी महापौरांची परवानगी घ्यायला पाहिजे होती हे निश्चित.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!