*मांगनूर येथील रस्ता गावाबाहेरून काढा*
*गारगोटी- गडहिंग्लज रस्त्याबाबत ग्रामस्थांची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी*
*अन्यथा ७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा*
कागल, दि. २२:
कूर-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी राज्य महामार्ग क्र. १८९ हा नियोजित रस्ता मांगनूर (ता. कागल) गावामधून न नेता गावाबाहेरून पर्यायी मार्गाने काढावा, या मागणीसाठी मांगनूरच्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात योग्य तोडगा न निघाल्यास ७ सप्टेंबरपासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांना सादर करण्यात आले आहे.
*सर्वपक्षीय लढा…….!*
ग्रामस्थांच्यावतीने आप्पासाहेब तांबेकर, धनाजीराव तोरस्कर, सागर मोहिते, पंडित चव्हाण, सर्जेराव जाधव, कृष्णात शिंदे, अण्णासाहेब पाटील, सर्जेराव भांदिगरे, सुरेश तोरस्कर या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक ग्रामस्थांनी हे निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रकाशराव आंबिटकर, ऊच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी- जिल्हापरिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी- सार्वजनिक बांधकाम विभाग यांनाही पाठविलेल्या आहेत.
*१०० ते १२५ कुटुंबे बेघर होण्याची टांगती तलवार*
निवेदनात म्हंटले आहे, मांगनूर हे गाव आधी वसलेले असून नंतर गावातून रस्ता तयार करण्यात आला. सध्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १०० ते १२५ पक्की घरे असून नागरिक येथे तीन पिढ्यांपासून वास्तव्यास आहेत. नियोजित रस्ता गावातून रुंद केल्यास ही घरे बाधित होऊन ग्रामस्थ बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे.
*अरुंद रस्ता व अपघातांचा धोका*
गावातील जागा अत्यंत अपुरी व धोकादायक वळणाची असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो आणि अपघातांची शक्यता वाढते. गावाबाहेरून रस्ता काढण्यासाठी यापूर्वी ३ ते ४ वेगवेगळे सर्व्हे झालेले आहेत. पर्यायी मार्ग उपलब्ध असताना गावातून रस्ता नेल्यास मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
*प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनाचा पवित्रा*
यापूर्वीही मांगनूरवासीयांनी निवेदने देऊन रास्ता रोको आंदोलने केली होती. मात्र; शासनाकडून दखलच घेतली गेलेली नाही. अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे, येत्या १५ दिवसांच्या आत शासनाने लेखी स्वरूपात सकारात्मक तोडगा न काढल्यास दि. ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरून बेमुदत रास्ता रोको व आमरण उपोषण करेल, असा स्पष्ट इशारा मांगनूर ग्रामस्थांनी दिला आहे.
………….
*गडहिंग्लज- गारगोटी हा राज्य महामार्ग क्रमांक -१८९ मांगनूर ता. कागल या गावाच्या बाहेरून व्हावा या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.*
==========



