महाराष्ट्र गंथोत्तेजक संस्थेचा डॉ. केळकर पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटेंना जाहीर
पुणे, दि.: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि डॉ. रामकृष्ण भांडारकर अशा दिग्गजांनी इ. स. १८९४ मध्ये स्थापन केलेल्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे यांच्या वतीने साहित्य सेवा आणि समाज कार्यासाठी देण्यात येणारा डॉ. आनंद केळकर स्मृती पुरस्कार यंदा प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. संस्थेच्या १३२ व्या वर्धापनदिनी होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. लवटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा, साहित्य, संशोधन, अनुवाद, ग्रंथ प्रसार आणि वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था ही महाराष्ट्रातील आद्य संस्था आहे. संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, इतिहासाचार्य राजवाडे, कृष्ण अर्जुन केळुस्कर, राजकवी यशवंत, साने गुरुजी, डॉ. शंकरराव खरात अशा अनेक दिग्गजांना ग्रंथ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ग्रंथ पुरस्कारांव्यतिरिक्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये डॉ. केळकर स्मृती पुरस्कार समाविष्ट असून गेल्या ५० वर्षांपासून मराठी-हिंदी साहित्य आणि समाजसेवेमध्ये योगदान देणारे डॉ. लवटे त्याचे यावर्षीचे मानकरी आहेत. डॉ. लवटे यांनी मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या अप्रकाशित आणि असंकलित साहित्याचे संपादन केले असून महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र मराठी वाङ्मयाचे हिंदी भाषांतर आणि संपादन प्रकल्प पूर्ण केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयाचे त्यांनी संपादित केलेले १८ खंड अलिकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहेत. अनाथश्रमात वाढलेल्या लवटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली. हिंदीचे प्रदीर्घ अध्यापन, विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद, पाच स्मृतीसंग्रहालयांची निर्मिती, ‘खाली जमीन वर आकाश’ या त्यांच्या गाजलेल्या आत्मकथनासह ३० पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यावर ४ संशोधनपर प्रबंध आणि ६ समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. भारत सरकारच्या रोल ऑफ ऑनरसह महाराष्ट्र फाऊंडेशन, हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार अशा विविध क्षेत्रातील सुमारे ५० पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.




