Spread the news

“जागतिक आय. व्ही. एफ. दिन विशेष”
आय. व्ही. एफ. ने फुलवले मातृत्व मृत्यूच्या छायेतून उमलले नवजीवन. २५ जुलै १९७८ रोजी जगातील पहिला आय. व्ही. एफ. बेबीचा जन्म झाला, त्यामुळे २५ जुलै हा दिवस जागतिक आय. व्ही. एफ. दिन असा ओळखला जातो. कोल्हापूरच्या पहिल्या आय. व्ही. एफ. बाळाचा जन्म पत्की हॉस्पिटलमध्ये १९९६ साली झाला. आय. व्ही. एफ. मधील मूळ तंत्रज्ञान काळानुरूप विकसित होत गेले. स्त्री बीज व शुक्रजंतू यांच्या संयोगातून प्रयोगशाळेमध्ये गर्भनिर्मिती आणि त्या गर्भाचे मातेच्या गर्भाशयामध्ये रोपण असे आय. व्ही. एफ. चे मूळ तत्त्व ! इक्सी, गर्भ गोठवणे, ब्लास्टोसिस्ट सारख्या परिपक्व गर्भाची प्रयोगशाळेमध्ये निर्मिती असे अनेकविध आय. व्ही. एफ. उपचारांमधील टप्पे पत्की हॉस्पिटलने आपल्या ३८ वर्षांच्या कालावधीमध्ये यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. आजच्या या विशेष दिवसाचे औचित्य साधून पत्की हॉस्पिटलमध्ये आय. व्ही. एफ. तंत्नाने यशस्वी झालेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या व दुर्मिळ केसविषयी माहिती डॉ. सतीश पत्की यांनी दिली. माले, ता. पन्हाळा येथील शेतकरी श्री. संभाजी पाटील व त्यांच्या पत्नी सौ. जयश्री यांच्या विवाहाला तब्बल २४ वर्षे झाली. या प्रदीर्घ कालावधीमध्ये विविध प्रकारचे उपचार घेऊन हे दांपत्य निराश झाले होते. सौ. जयश्री यांचे वय ४२ तर श्री. संभाजी ४५ वर्षांचे. त्यांच्या घरचे डॉ. संदीप काळे या जोडप्यास आय. व्ही. एफ. उपचारांसाठी पत्की हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. आय. व्ही. एफ. च्या पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आले, परंतु दुर्दैवाने ५ व्या महिन्यात गर्भपात झाल्याने पुन्हा निराशा आली. डॉक्टरांच्या समुपदेशन व आश्वासक शब्दांमुळे दुसऱ्यांदा आय. व्ही. एफ. उपचारांची सुरुवात झाली. या प्रयत्नामध्ये पुन्हा यश आले. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यापासून प्रत्येक दिवस हा आशेचा, काळजीचा आणि ईश्वरावरील श्रद्धेचा प्रवास होता. गरोदरपणामध्ये सर्व तपासण्या नियमितपणे करण्यात आल्या. आई व गर्भाची प्रकृती सातत्याने तपासली जात होती. प्रत्येक निर्णय वैद्यकीय निकषांनुसार अत्यंत काळजीपूर्वक घेतला गेला.
नववा महिना झाल्यानंतर मातेचे वय व सोनोग्राफीच्या निकषांवर आधारित दि. १३ जुलै २०२६ या दिवशी नियोजित सिझरियन शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. ऑपरेशन थिएटरची तयारी पूर्ण झाली. पेशंटला नेहमीप्रमाणे ऑपरेशन टेबलवर घेण्यात आले. सर्व प्राथमिक तपासण्या समाधानकारक होत्या. भूल प्रक्रियाही सुरू झाली नव्हती आणि तेव्हाच अवघ्या काही क्षणात परिस्थितीने भीषण वळण घेतले. आई अचानक कोसळली. रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली आला. ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित प्रत्येकासाठी तो क्षण अनपेक्षित आणि अत्यंत गंभीर होता. वैद्यकीय भाषेत याला सडन मॅटर्नल कोलॅप्स असे संबोधले जाते प्रसूतिशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ पण जीवघेण्या आणीबाणीच्या परिस्थितींपैकी एक. अशा प्रसंगी फुफ्फुसातील रक्तवाहिनीत गुठळी जाणे, अॅग्निऑटिक फ्लुइड अॅम्बोलिझम यासारख्या गंभीर कारणांचा विचार केला जातो. त्याक्षणी महत्त्वाची वेळ होती ती क्षणात उपचार सुरू करण्याची. दरम्यान आईच्या या बिकट परिस्थितीमुळे गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके मंदावू लागले. काही क्षणांचा विलंब झाला तर नऊ महिन्यांच्या अथक उपचारांनंतर मिळणारे बाळ गमावण्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवला असता. अनुभव, शांतता, समन्वय आणि विलक्षण संघभावना यांच्या बळावर कृत्निम श्वसनयंत्नाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. सौ. जयश्री यांनी एका गोडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने ऑपरेशन थिएटरमध्ये नवचैतन्याची लहर आली. शस्त्रक्रियेनंतर मातेचा रक्तदाब तसेच नाडीचे ठोके यामध्ये सुधारणा होत गेली. या शस्त्रक्रियेमध्ये प्रसूतितज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. सौ. उज्ज्वला पत्की, डॉ. सुहृद पत्की, डॉ. आदिती कुंटे, भूलतज्ज्ञ व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीस्वरूप कुलकर्णी व डॉ. साईप्रसाद यांचा सहभाग होता. पत्की हॉस्पिटलमधील शस्त्रक्रियेनंतर पुढील २४ तास सौ. जयश्री यांना डायमंड हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले व त्यानंतर त्यांची व बाळाची भेट पुन्हा पत्की हॉस्पिटलमध्ये आणल्यावर झाली. त्या दिवशी केवळ एका बालकाचाच जन्म झाला नाही तर एका आईला नव्याने जीवन लाभले. सौ. जयश्री व श्री. संभाजी पाटील यांच्या २४ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णत्व लाभले. आजच्या जागतिक आय. व्ही. एफ. दिनाच्या दिवशी पाटील कुटुंबियांनी सर्व डॉक्टर टीमचा सत्कार केला. त्याचप्रमाणे पत्की हॉस्पिटलच्या वतीने डॉ. श्वेता कुलकर्णी व डॉ. सुहृद पत्की यांनी सौ. जयश्री व श्री. संभाजी यांचा सत्कार केला.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!