सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी: कॅप्टन आशिष दामले

Spread the news

सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी: कॅप्टन आशिष दामले

­

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सध्याचे महायुतीचे सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी निर्णय घेत आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या मंडळामार्फत फक्त ब्राह्मण नव्हे तर सर्व स्तरातील शेतकऱ्यांना यांच्या योजनांचा लाभ मिळतो आहे. यामुळे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे.
परशुराम आर्थिक विकास महामंडळातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कर्ज दिले जाते. हे कर्ज व्याज परतावा योजनेतून दिले जाते. एका व्यवसायासाठी १५ लाख रुपयांच्या कर्जासाठी महामंडळ व्याज परतावा देतं. तर समुह गटकर्जासाठी ५० लाख, शिक्षणासाठी दहा लाख रुपयांच्या कर्जासाठी व्याज परतावा दिला जातो. तसेच उच्च शिक्षणासाठी निवास आणि भोजनासाठी भत्ता देखील महामंडळाकडून देण्यात येतो.
महिला बचत गटास वीस लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे. असे प्रतिपादन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले (कॅबिनेट राज्यमंत्री दर्जा) यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी म्हणाले, शेतकऱ्याने प्रगतशील बनणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात वातावरण आणि निसर्ग यांचा समतोल बिघडलेला आहे याचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी आपली शेती करणे आवश्यक आहे.

  •  

चितळे उद्योंग समहाचे संचालक गिरीश चितळे म्हणाले, शंभर वर्षांपूर्वीचा शेतकरी आणि आत्ताचा शेतकरी यांच्या आर्थिक स्तरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जोपर्यंत हा शेतकरी स्वतः पिकवलेला माल स्वतः विकत नाही. म्हणजे विपणन व्यवस्था चांगली करत नाही. तोपर्यंत त्याचा आर्थिक स्तर उंचावणार नाही आणि तो अन्नदाता होणार नाही.
हवामान तज्ञ पंजाबराव डख म्हणाले, निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करणे भविष्यात शक्य होणार नाही. जसे वातावरण आहे, त्याप्रमाणे पीक लावणी गरजेचे आहे. अल निनो च्या प्रभावामुळे यावर्षी दुष्काळ पडणार असे म्हटले जाते. परंतु दुष्काळ नाही तर सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी पाऊस पडणार आहे. ज्यावर्षी पाऊस कमी पडतो. त्यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सफल होतो. त्यामुळे २०२६ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगले असणार आहे.

सदर मेळावा मांगल्य हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे पार पडला. महाराष्ट्रातून तब्बल ५०० हून अधिक शेतकरी या मेळाव्यास उपस्थित होते.
या मेळाव्यास महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान नाबार्ड मधील विविध योजनांची माहिती आर.एस.चौगले आणि द पॉली फॉस्फेट तंत्रज्ञानावर जयदेव बर्वें यांनी माहिती दिली.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०१६ हे वर्ष आंतरराष्ट्ीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या निमित्ताने दहा महिला शेतकऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सहकार भूषण पुरस्काराने गिरीश चितळे यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष शामराव जोशी, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष हरीश शिंदे, विवेक जोशी,गुरुप्रसाद कुलकर्णी, प्रमोदिनी हर्डीकर, सचिन कुलकर्णी, जिवन कुलकर्णी,सचिन पितांबरे, उदय गोसावी, के.रामाराव, सचिन जिल्हेधार आदी उपस्थित होते.

चौकट : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर सातारा पुणे अशा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये १९ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान चांगला पाऊस होणार आहे. तसेच गारपीटीची शक्यता देखील त्यांनी वर्तवली. कर्नाटकच्या काही भागातही हा पाऊस असेल. ज्या शेतकऱ्यांनी हळद, गहू, कांदा लावलेला आहे, त्यांनी १७ एप्रिलच्या आत तो काढून घ्यावा. असा इशारा देखील त्यांनी दिला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!