गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे पॅनेल बनवावे……
गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांची मागणी
कोल्हापूर, दि. २०:
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षांचे संयुक्त पॅनेल बनवावे, अशी मागणी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील आणि केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केली आहे. श्री. पाटील व श्री. माने यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्धीला दिलेले आहे.
या पत्रकात पुढे म्हटलेले आहे, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे सुपुत्र नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील महायुतीतील नेत्यांच्या समझोत्या संदर्भात बैठका घेऊन काही नेत्यांशी चर्चा केल्याचे वृत्तपत्रांमधून वाचले. मंत्री श्री. पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे काही नेते, आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ, पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनयरावजी कोरे यांच्याबरोबर चर्चा केलेल्या वृत्ताची माहिती आम्हाला मिळाली. तसेच; काही नेत्यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि विशेषता आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना वगळून पॅनेल तयार करा, अशी भूमिका मांडल्याचेही खात्रीलायकरीत्या समजते.
त्या पार्श्वभूमीवर तमाम दूध उत्पादकांच्यावतीने आमचे नेते नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना कळकळीची विनंती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यामध्ये सोबत येणाऱ्या मित्र पक्षांना घेऊन गोकुळ दूध संघाची ही निवडणूक लढवावी. आम्ही छातीठोकपणे सांगतो की, गोकुळ दूध संघात महायुतीचीच सत्ता येईल आणि त्या निकालाच्या रूपाने मुख्यमंत्र्यांना एक चांगली भेट देऊ. या संदर्भात यापुढे मुख्यमंत्र्यांशी कधीकाळी चर्चा होईल त्यावेळी हा मुद्दा नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी जरूर मांडावा. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावावा आणि “दूध का दूध आणि पाणी का पाणी” करून दाखवावे. त्या माध्यमातून दूध उत्पादक हे सत्तेमध्ये असलेल्या महायुतीच्याच बाजूने आहेत, हे एकदा सिद्ध करावे.




