कोल्हापूरात एलबीएफ शॉपिंग फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ
अशोकराव स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन; उद्योग, व्यापार आणि उद्योजकतेला नवी चालना
🛍️🛒🎁📺🛍️🛒
कोल्हापूर : लिंगायत बिझनेस फोरम, कोल्हापूर (LBF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एलबीएफ शॉपिंग फेस्टिव्हलचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव (मलय्या) स्वामी यांच्या शुभहस्ते या भव्य शॉपिंग फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख उपस्थितीत मा. डॉ. शिवशंकर मरजक्के (चिफ कन्सल्टिंग न्यूरोसर्जन), मा. श्री. सतीश घाळी (अध्यक्ष, वीरशैव को-ऑप. बँक, कोल्हापूर) आणि मा. श्री. किरण गवळी (अध्यक्ष, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाज) वीरशैव बँकेचे संचालक सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सौ. सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, सुधाकर तोडकर, गुरुबाळ माळी उपस्थित होते. तसेच आयोजक म्हणून लिंगायत बिझनेस फोरमचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोकराव स्वामी यांचे मार्गदर्शनपर भाषणात
उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. अशोकराव स्वामी यांनी वस्त्रोद्योगसह गृह, उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग आणि स्थानिक उद्योग व्यवसायाच्या वाढीवर भर देत मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,
आजच्या स्पर्धात्मक युगात स्थानिक उद्योगांनी गुणवत्ता, नावीन्य आणि ग्राहकांचा विश्वास या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. कोल्हापूर सारख्या औद्योगिक जिल्हातअशा प्रकारचे शॉपिंग फेस्टिव्हल हे केवळ विक्रीपुरते मर्यादित नसून, समाजातील नवउद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे माध्यम आहे.
ते पुढे म्हणाले की, लघूउद्योग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, ब्रँडिंग आणि मार्केटिंग यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांशी *संवाद साधण्याची संधी मिळते, ज्यामुळे उद्योगाला बळकटी मिळते.
अशोक स्वामी यांनी युवा उद्योजकांना प्रोत्साहन देत सांगितले की, समाजातील नवीन पिढीने पारंपरिक व्यवसायासोबत आधुनिक विचारांची जोड देत पुढे यावे. स्टार्टअप संस्कृतीचा स्वीकार करून स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. तसेच समाजातील युवा उद्योजकांना सदैव उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेऊन मदतीस तत्पर असु असे यावेळी नमुद केले.
उद्योग व व्यापाराला चालना
या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ वस्त्र, रेडीमेड कपडे, गृहउपयोगी वस्तू, हस्तकला आणि अन्य उद्योग व्यवसायाशी संबंधित स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदीचा आनंद घेतला.
आयोजकांनी सांगितले की, या फेस्टिव्हलमुळे स्थानिक व्यावसायिकांना आपली उत्पादने सादर करण्याची संधी मिळत असून, ग्राहकांना एकाच छताखाली विविध वस्तू उपलब्ध होत आहेत.
उपस्थिती आणि आयोजन
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिंगायत बिझनेस फोरमचे अध्यक्ष श्री. अमरदीप पाटील, उपाध्यक्ष श्री. संदीप नष्टे सचिव श्री. अभिजित बाडकर, खजिनदार श्री. राहुल सव्यनावर आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
शेवटी, खरेदीचा महोत्सव… आनंदाचा उत्सव! या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या शॉपिंग फेस्टिव्हलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पुढील काही दिवसांतही मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन एच.टी. पाटील हॉल, ताराराणी विद्यापीठ कॅम्पस, राजारामपुरी जनता बाजारजवळ, कोल्हापूर येथे करण्यात आले असून, २१ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.




