आज चेतना अपंगपती विकास संस्थेचा ४० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मुले आणि शिक्षक व इतर कर्मचारी नटून थटून शाळेत आले होते.सर्व शाळा सजवण्यात आली होती. रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आज ज्याचे उद्घाटन होणार होते ती चेतना शॉपी अतिशय नाविन्यपूर्ण रीतीने सजवली गेली होती. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय महापौर रूपाराणी निकम अगदी वेळेत उपस्थित झाल्या. त्यांच्या हस्ते चेतना शॉपीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात तयार होणाऱ्या विविध वस्तू पाहून मा.महापौर यांनी समाधान व्यक्त केले व हे करून घेणाऱ्या शिक्षक व मुलांचे कौतुक केले. श्री. विनोद तलगेरी व वृंदा तलेगिरी यांचे हस्ते स्पर्श या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सेन्स इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या या प्रकल्पाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील बधिरांध मुलांच्या शिक्षण पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.याचवेळी श्री व सौ तलगेरी यांचे हस्ते कुष्ठधाम येथील कुष्ठ बांधवांना शिधावाटप करण्यात आले . मुख्य कार्यक्रमात कार्यकारी अध्यक्ष श्री पवन खेबुडकर यांनी सर्वांचे स्वागत केले व प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन नवीन उपक्रमांची माहिती दिली. चेतना शॉपीच्या संदर्भात बोलताना हा नेहमीसारखा व्यवसाय नसून या मुलांच्या हाताला काम मिळण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी लोकांपर्यंत त्यांच्या या वस्तू जाव्यात हा या मागचा उद्देश असल्यामुळे मा. महापौर यांनी यात लक्ष घालून विविध ठिकाणी चेतना शॉपी उभी करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी केली. डॉ.सुनील पाटील यांनी प्रमुख अतिथी महापौर मा. रूपाराणी निकम, महिला बालकल्याण समितीच्या सभापती कौसर बागवान व सदस्य अरुणा गवळी तसेच विनोद तलगेरी यांची सर्वांना ओळख करून दिली. आपल्या भाषणात रूपा राणी निकम यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आपण या मुलांच्या क्षमता पाहून स्तिमित झालो आहोत असे सांगितले. या संस्थेचे कोणतेही काम माझ्यापर्यंत आल्यास मी ते तडीला नेण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन त्यांनी दिले व चेतना शॉपी शहरात जिथे जिथे लावणे शक्य असेल तिथे लावण्यासाठी सहकार्य केले जाईल असे सांगितले. श्री तलगेरी सरांनी त्यांचे आजवरचे चेतना संस्थेविषयी अनुभव व संस्थेला मदत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याबाबत विवेचन केले. याप्रसंगी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संस्थेने विद्यार्थी उत्तेजन योजनेअंतर्गत दोन मुले व दोन मुली यांना विशेष सहाय्यक या पदावर नेमणूका केल्या असून त्यांना नेमणुकीची पत्रे देण्यात आली. आता या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दरमहा काही आर्थिक बक्षिसाच्या स्वरूपात उत्तेजन दिले जाणार आहे. याप्रसंगी क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ ही संपन्न झाला. श्री कृष्णात चौगले यांनी आभार मानले. श्री सुधीर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी पत्रकार, चेतनाचे सर्व पदाधिकारी,श्री ईस्माईल बागवान,संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक, पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




