३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; ‘उत्कर्ष २०२६’मधून विद्यार्थी नेतृत्वाला नवी दिशा!

Spread the news

३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; ‘उत्कर्ष २०२६’मधून विद्यार्थी नेतृत्वाला नवी दिशा!

­

 

अभाविप कोल्हापूर महानगरच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; विद्यार्थीहित, समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प

  •  

कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट २०२६ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर आयोजित ‘उत्कर्ष २०२६ – प्रतिभा सन्मान सोहळा व कार्यकर्ता संमेलन’ शाहू स्मारक, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील गुणवत्तेचा गौरव करण्यासोबतच विद्यार्थी नेतृत्वाला दिशा देणे, कार्यकर्त्यांना नवी जबाबदारी देणे आणि विद्यार्थी शक्तीला राष्ट्रनिर्माणाच्या कार्याशी जोडणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूर्व कार्यकर्ते व अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ नामांकित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांतील प्रथम वर्षातील गुणवंत विद्यार्थी, NSS व NCC मधील उत्कृष्ट कॅडेट व स्वयंसेवक, क्रीडा, कला, NEET परीक्षेत ५०० पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या ३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या पालक व शिक्षकांच्या योगदानाचीही यावेळी दखल घेण्यात आली.

कार्यक्रमास राष्ट्रीय सह संघटनमंत्री श्री. देवदत्त जोशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रसिद्ध उद्योजक श्री. दीपक चोरगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पुनर्निर्वाचित महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील गुरव, नवनिर्वाचित महानगर मंत्री प्रेम राजमाने आणि कार्यक्रम प्रमुख तनिष्क दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील गुरव यांनी आजच्या Gen Z पिढीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात माहिती व तंत्रज्ञानाशी जोडलेली असून तिच्यात मोठी क्षमता आहे. या पिढीतील सुप्त प्रतिभा ओळखून तिला विधायक, सामाजिक व राष्ट्रहिताच्या दिशेने योग्य मार्गदर्शन देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यामध्ये नेतृत्व, सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना व राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

यानंतर मागील वर्षाचे जिल्हा संयोजक वेदांत कुलकर्णी यांनी वार्षिक मंत्री प्रतिवेदन सादर करत अभाविप कोल्हापूर महानगरच्या मागील वर्षभरातील कार्याचा आढावा मांडला. यामध्ये ‘नमामी पंचगंगा’ अभियान, फुटबॉल स्पर्धा, उन्हाळी सुट्टी शिबिर यांसह विविध विद्यार्थीहिताचे, सामाजिक व संघटनात्मक उपक्रम, विद्यार्थी प्रश्नांवरील आंदोलने तसेच विविध महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संघटनात्मक क्षमता वाढविण्यासाठी वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावाही त्यांनी यावेळी मांडला.

यानंतर अभाविप कोल्हापूर महानगरच्या नवीन कार्यकारिणीसाठी निर्वाचन प्रक्रिया पार पडली. श्री. केशव गोवेकर यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. यामध्ये प्रा. डॉ. सुनील गुरव यांची महानगर अध्यक्षपदी पुनर्निवड, तर प्रेम राजमाने यांची महानगर मंत्रीपदी निवड जाहीर करण्यात आली. यासोबतच महानगर कार्यकारिणी, तीन नगर कार्यकारिणी तसेच सात महाविद्यालय कार्यकारिणींची घोषणा करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनवृद्धी, विद्यार्थी प्रश्नांवरील प्रभावी कार्य आणि राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित कार्यकर्ते घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.

नवनिर्वाचित महानगर मंत्री प्रेम राजमाने यांनी आपल्या मनोगतात संघटनेने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अभाविपच्या कोल्हापूर महानगराच्या इतिहासात कमी वयात महानगर मंत्री म्हणून जबाबदारी मिळणे हा केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.“ही जबाबदारी केवळ एका व्यक्तीची नसून कोल्हापूर महानगरातील प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. येणाऱ्या काळात महानगरातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अभाविपचे कार्य, विचार आणि विद्यार्थीहिताचे उपक्रम पोहोचविण्यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांच्या साथीने प्रयत्न करू. प्रत्येक महाविद्यालयात सक्षम विद्यार्थी नेतृत्व घडवून विद्यार्थी प्रश्नांवर प्रभावीपणे काम करू. येणाऱ्या काळात आपण दाखवून देऊ की ही Gen Z पिढी राष्ट्रहितासाठी काम करणारी पिढी आहे, कोणत्याही प्रपोगंडामध्ये फसणारी नाही. विद्यार्थी शक्तीला योग्य दिशा देत विद्यार्थीहित, समाजहित आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख अतिथी प्रसिद्ध उद्योजक श्री. दीपक चोरगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनांपासून दूर राहून कौशल्यविकासावर भर देण्याचे आवाहन केले. उद्योग क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असल्याचा अनुभव सांगत त्यांनी युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे प्रतिपादन केले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांमध्ये सातत्याने वाढ केली पाहिजे. शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव, नवकल्पना, उद्योजकता आणि आत्मविश्वास यांना महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय सह संघटनमंत्री श्री. देवदत्त जोशी यांनी विद्यार्थी व पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याचा सन्मान होताना तो क्षण पालकांच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण असतो, असे सांगत विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक व शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या काळात शिक्षण, न्याय व राजकीय व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत Gen Z पिढीकडे दोषारोपाच्या नजरेने न पाहता तिच्यातील क्षमता ओळखून तिला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजचा विद्यार्थी माहितीच्या अभावामुळे नव्हे, तर योग्य-अयोग्य यातील विवेक जागृत करणाऱ्या योग्य मार्गदर्शकांच्या अभावामुळे संभ्रमात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना सक्षम मेंटॉरशिप मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध विद्यार्थी आंदोलनांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांविषयी जागरूकता वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. “या देशात सर्वोच्च भारतमाता आहे आणि तिची सेवा करणे हे प्रत्येक तरुणाचे कर्तव्य आहे,” असे सांगत त्यांनी राष्ट्रभक्ती, सामाजिक उत्तरदायित्व आणि कर्तव्यभावनेचे महत्त्व अधोरेखित केले. “आजच्या तरुणांच्या ओठांवर कोणती गाणी आहेत, त्यावर देशाची दिशा ठरते,” असे सांगत त्यांनी तरुणांनी आपले सांस्कृतिक भान जपण्याचे आवाहन केले. “आम्ही १९४७ पाहिले नाही; परंतु २०४७ पाहणार आहोत. विकसित भारताच्या निर्मितीत भारतीय तरुण जगाला दिशा देणार आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या गुणवत्तेचा गौरव नसून, भविष्यातील कर्तव्याची जाणीव करून देणारा सन्मान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, राष्ट्रभक्ती व कर्तव्यभावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी काळात विद्यार्थी प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना संघटनेच्या कार्याशी जोडण्याचा संकल्प करण्यात आला. ‘ज्ञान • शील • एकता’ या ब्रीदवाक्याला समोर ठेवत अभाविप कोल्हापूर महानगरची नवी कार्यकारिणी विद्यार्थीहित, समाजहित आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख तनिष्क दळवी यांनी केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत ‘उत्कर्ष २०२६ – प्रतिभा सन्मान सोहळा व कार्यकर्ता संमेलन’ उत्साहात संपन्न झाले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!